जयपूर - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या वृत्ताचे सुषमा स्वराज यांनी खंडन केले आहे. " मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे खरे आहे. मात्र मी राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, असे त्या म्हणाल्या. जयपूर येथे आलेल्या सुषमा स्वराज यांनी आपल्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. " दोन वर्षांपूर्वी झालेल्या किडनी प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मला धुळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मी दीर्घकाळापासून प्रचारसभांपासून दूर आहे. मी जेव्हा जेव्हा निवडणुकांच्या कार्यक्रमांना जाते तेव्हा माझ्या कार्यक्रमांचे आयोजन बंद ठिकाणी व्हावे, असा माझा प्रयत्न असतो, धुळीपासून दूर राहणे माझ्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे आणि त्याला माझे प्राधान्य आहे." असे स्वराज यांनी सांगितले. त्यामुळेच मी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, सुषमा स्वराज यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 22:24 IST