आयआयटीयनसमोर आता राजकारणाचाही पर्याय
By Admin | Updated: February 15, 2015 23:39 IST2015-02-15T23:30:54+5:302015-02-15T23:39:56+5:30
असे आयआयटी खरगपूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गाला असलेल्या अटल आशुतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने म्हटले.

आयआयटीयनसमोर आता राजकारणाचाही पर्याय
कोलकाता : आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या खरगपूरमधून आयआयटी झाले, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांना आता कारकीर्द घडविण्यासाठी राजकारण प्रवेश हाही एक पर्याय वाटू लागला आहे. अनेकांनी केजरीवालांचा दिल्लीतील अभूतपूर्व विजय आम्हाला राजकारण प्रवेशासाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आयआयटी व अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असलेले लोकही राजकारणात यशस्वी होऊ शकतात, हे केजरीवालांनी दाखवून दिले आहे, असे आयआयटी खरगपूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गाला असलेल्या अटल आशुतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने म्हटले.
मूळचे दिल्लीकर असलेल्या केजरीवाल यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहभागी होत राजकारणात मिळविलेल्या यशामुळे आम्हाला राजकारण प्रवेशाचा मार्ग सोपा वाटत आहे, असे अटल याने म्हटले. त्याने यापूर्वीच आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. जिओफिजिक्स दुसऱ्या वर्गाला असलेल्या लोकेश देशमुख याने आपच्या आॅनलाईन व फोनवरील प्रचाराला मदत केली.
‘आप’कडे ओढा
देशातील सर्वोच्च इंजिनिअरिंग संस्थेपैकी एक असलेल्या आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांचा आपमध्ये प्रवेश करण्याकडे कल वाढत आहे. केजरीवाल हे मूळचे खरगपूर कॅम्पसमधील असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आकर्षण आहे. ते आपल्यापैकीच एक असल्याची भावना आहे, असे लोकेशने म्हटले.
झोपडपट्टी हटविल्याचा विरोध
गाझियाबादच्या शाहदरा भागातील झोपडपट्टी हटविल्याच्या विरोधात शनिवारी शेकडो लोकांनी केजरीवाल यांच्या कोशांबी येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
‘पालिका अधिकाऱ्यांची ही क्रूरता आहे. त्यांनी आपल्या झोपड्या पाडल्या आणि आम्हाला बेघर केले. यावेळी त्यांनी आमचे सामान फेकून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यांनी लहान मुलांनाही सोडले नाही,’ असा आरोप निदर्शने करणाऱ्या ३० वर्षीय विजयवती हिने केला. तथापि, हे लोक सरकारी जागेवर झोपड्या बांधत असल्याने त्यांचे बांधकाम पाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)