नवी दिल्ली : लग्नाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जर नोकरीसाठी परदेशात जायचे असेल तर त्याची पत्नी भारतातच राहिली पाहिजे अशी अट राजस्थान न्यायालयाने त्याला घातली आहे.
याचिकाकर्त्याने म्हटले की, उच्च न्यायालयाने अमेरिकेत काम करणाऱ्या त्याच्या पत्नीला तिची बाजू ऐकल्याशिवाय किंवा या खटल्याचा ती भाग नसताना भारतात राहण्याचे निर्देश दिले आहे. हे नियमांचे उल्लंघन आहे.
उच्च न्यायालयाचा हा निर्देश ‘चुकीचा’ आहे आणि संविधानाच्या कलम २१ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो, असे म्हणत अभियंत्याने वकील अश्विनी दुबे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होईल.
पळून जाण्याचा प्रश्नच नाही : तो एका ठरावीक कालावधीसाठी विदेशात जात असून, कोर्टाच्या निर्देशानुसार तो केव्हाही उपस्थित राहील, याची शपथही घेत आहे. त्यामुळे खटल्यात विलंब होण्याचा किंवा तो पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याचिकेत काय म्हटलेय? याचिकाकर्ता भारतीय नागरिक आहे आणि तो इतर कोणत्याही देशाचा नागरिक नाही. तो अमेरिकेतील महावाणिज्य दूतावासाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. तो फरार होण्याची शक्यता नाही कारण तो नोकरीच्या व्हिसावर परदेशात जाऊन आपला उदरनिर्वाह करण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत, तो फरार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
काय आहेत आरोप? ख्रिश्चनगंज पोलिस ठाण्यात अभियंत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. लग्न करण्याचे आश्वासन देऊन तक्रारदार महिलेशी त्याने लैंगिक संबंध ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.अटकेच्या शक्यतेने त्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, जो मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली, परंतु त्याची पत्नी भारतातच राहील अशी अटही घातली आहे.