तेलंगणचा अपमान कराल तर गाडून टाकू - चंद्रशेखर राव
By Admin | Updated: September 10, 2014 10:20 IST2014-09-10T10:17:19+5:302014-09-10T10:20:42+5:30
स्वतःला हिटलर म्हणून घेणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी हिटलरगिरीचे दर्शन घडवत प्रसारमाध्यमांना थेट गाडून टाकण्याची धमकी दिली.

तेलंगणचा अपमान कराल तर गाडून टाकू - चंद्रशेखर राव
ऑनलाइन लोकमत
वारंगल (तेलंगण), दि. १० - स्वतःला हिटलर म्हणून घेणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी हिटलरगिरीचे दर्शन घडवत प्रसारमाध्यमांना थेट गाडून टाकण्याची धमकी दिली. प्रसारमाध्यमांनी नवीन तेलंगण राज्याचा अपमान केल्यास त्यांना जमिनीच्या १० फूट खाली गाडून टाकू असा धमकीवजा इशाराच राव यांनी दिला आहे.
तेलंगणमध्ये १६ जूनपासून दोन वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले असून या वृत्तवाहिन्यांनी तेलंगणसंदर्भात आक्षेपार्ह वृत्तांकन केल्याचा आरोप तेलंगण सरकारने केला आहे. या कारवाईचे समर्थन करताना चंद्रशेखर यांनी प्रसारमाध्यमांवर जोरदार टीका केली. 'तेलंगण विरोधात वृत्त दाखवणा-या दोन वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करणा-या राज्यातील केबल चालकांचे मी आभार मानतो. जर या वृत्तवाहिन्या सुधारल्या नाहीत तर त्यांना मी धडा शिकवीन असे विधान चंद्रशेखर राव यांनी केले. जर या वृत्तवाहिन्यांनी अशाच पद्धतीने तेलंगणचा अपमान केला त्यांना जमिनीच्या १० फूट खाली गाडून टाकू असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रशेखर यांच्या या विधानावर काँग्रेस नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. चंद्रशेखर राव यांनी भाषण करताना थोडे संयम बाळगावे असा सल्ला काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी दिला आहे.