नवी दिल्ली : चीनशी झालेल्या संघर्षानंतर भारतीय लष्कराबाबत केलेल्या काही विधानांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चांगलेच सुनावले. तुम्ही सच्चे भारतीय असाल, तर अशी वादग्रस्त वक्तव्ये करणार नाही, या शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणी लखनौच्या सत्र न्यायालयात सुरू खटल्याच्या कामकाजाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली.न्या. दीपांकर दत्ता, न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार व तक्रारदाराला नोटीस बजावली. खंडपीठाने राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले की, चीनने भारताचा २ हजार किमीचा भूभाग बळकावला आहे, हे तुम्हाला कसे माहीत झाले? तुम्ही तिथे होतात का? या घटनेचे काही ठोस पुरावे तुमच्याकडे आहेत का? हे सारे मुद्दे लोकसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने तुम्ही संसदेत का मांडत नाही? सोशल मीडियावरच ही मते का व्यक्त करता? काहीही ठोस पुरावे नसताना अशी वादग्रस्त विधाने तुम्ही का करता?
आपल्या विरोधात राजकीय हेतूने तक्रार दाखल करण्यात आली२९ मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली होती. आपल्या विरोधात राजकीय हेतूने तक्रार दाखल करण्यात आली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात केला होता. तक्रारदार उदय शंकर श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, चीनसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी भारतीय लष्कराविषयी अवमानकारक विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला. - संबंधित वृत्त/आतील पानात