बुधवारी रात्री टाईम्स नाऊ-मॅट्रीझने लोकसभा निवडणुकीपूर्वीचा ओपिनिअन पोल जाहीर केला होता. देशात आज निवडणुका झाल्या तर भाजपच्या युतीला किती जागा मिळतील तर काँग्रेसच्या आघाडीला किती मिळतील, याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यापूर्वीच एक दिवस मोदींनी लोकसभेत भाजपा ३७० जागा जिंकणार असल्याचे जाहीर सांगितले होते तर एनडीए एकूण ४०० जागा जिंकणार असा दावा केला होता. आता लगेचच आजतक-सीव्होटरचा सर्व्हे जाहीर झाला आहे.
यामध्ये पण टाईम्स नाऊ सारखेच निकाल दिसत आहेत. या सर्व्हेमध्ये अनेक राज्यांत भाजपाला एकहाती विजय मिळताना दिसत आहे. युपीत भाजपा ७० जागा जिंकताना तर सपा सात जागा जिंकताना दिसत असून काँग्रेसला फक्त १ जागा दाखविण्यात आली आहे. हा सर्व्हे आहे, खरा निकाल लागायला अजून तीन महिने बाकी आहेत. परंतु, यामुळे विरोधकांचे एकतर मनोबल कमी होईल किंवा ते आणखी त्वेशाने लढतील.
उत्तराखंडमध्ये भाजपा पाचपैकी पाच जागा जिंकताना दिसत आहे. हरियाणामध्ये भाजप ८ काँग्रेस २ जागा जिंकताना दिसत आहे. पंजाबमध्ये भाजपला २, काँग्रेसला ५ आणि आपला ५ जागा मिळताना दिसत आहेत. हिमाचलमध्ये भाजपला चारपैकी चार जागा दिसत आहेत.
मध्य प्रदेशमध्ये भाजपाला २७ आणि काँग्रेसला २ जागा मिळताना दिसत आहेत. छत्तीसगढमध्ये भाजपाला १० आणि काँग्रेसला १ जागा मिळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजप, काँग्रेसला भोपळा दिसत आहे. वायएसआर काँग्रेसला ८ आणि टीडीपीला १७ जागा मिळताना दिसत आहेत.
राजस्थानमध्ये भाजपला पैकीच्या पैकी म्हणजे २५ जागा मिळताना दिसत आहेत. दिल्लीत आप आणि काँग्रेसला भोपळा हाती लागणार आहे. भाजपला सातपैकी सात जागा मिळताना दिसत आहेत. तिकडे कर्नाटकात भाजपला २८ पैकी २४ जागा मिळताना दिसत आहेत. तामिळनाडूत भाजपाला भोपळा मिळणार आहे, इंडिया आघाडीला ३९ पैकी ३९ जागा मिळताना दाखविण्यात आले आहे.
केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत. मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार जर आज निवडणूक झाली तर काँग्रेस आघाडीला १८ जागा मिळू शकतात. डाव्या आघाडीला २ जागा मिळू शकतात. महाराष्ट्राचा ओपिनिअन पोल अद्याप यायचा आहे.