माझा फायदा हवा असेल तर भाजपाचे सरकार आणा - हरयाणात नरेंद्र मोदी
By Admin | Updated: October 4, 2014 13:13 IST2014-10-04T11:29:26+5:302014-10-04T13:13:08+5:30
हरयाणापासून मी अत्यंत जवळ आहे, परंतु मला तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मध्ये अडथळा नको असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे

माझा फायदा हवा असेल तर भाजपाचे सरकार आणा - हरयाणात नरेंद्र मोदी
>ऑनलाइन टीम
करनाल (हरयाणा), दि. ४ - हरयाणापासून मी अत्यंत जवळ आहे, परंतु मला तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मध्ये अडथळा नको असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. हरयाणामध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात मोदींनी केली असून नंतर ते महाराष्ट्रातही तीन सभा घेणार आहेत. केंद्रातल्या सत्तेचा लाभ राज्यात पोचायला हवा असेल तर राज्यांतही भाजपाचेच सरकार हवे अशी अप्रत्यक्ष भूमिका मोदींनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे.
भारत सरकारने बासमतीच्या निर्यातीवर बंदी घातल्याची खोटी माहिती विरोधक पसरवत असल्याचे सांगत अशी कोणतीही गोष्ट केली नसल्याचे मोदी म्हणाले. हरयाणामध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून इथे आपले कुठलेही नियंत्रण नाहीये, त्यामुळे तुम्हाला बदल हवा असेल तर भाजपाचंच सरकार यायला हवं अशी साद मोदी यांनी घातली. जगभरातून आज भारताला महत्त्व दिलं जातंय, त्याचं कारण मोदी नाहीयेत तर केंद्रातलं स्थिर सरकार आहे. त्यामुळे भारतीय जनतेला जगभरातून मिळणारं महत्त्व अमेरिका, जपान व चीनच्या सहकार्यातून दिसत असल्याचं मोदी म्हणाले.
त्यामुळे हरयाणाला जर वैभव बघायचं असेल, केंद्रातल्या सरकारचा फायदा व्हावा हवा असेल तर इथेही संपूर्ण भाजपाचं सरकार यायला हवं असं मोदी म्हणाले.
हरयणामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम होत असून, अमेरिकेसोबत मी नुकताच एक करार केला असून हरयाणामध्ये कर्करोगावर प्रचंड संशोधन करण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितले.
बेरोजगारी, कमी उत्पन्न, शिक्षणाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव आणि शेतक-यांचे हाल या सगळ्यासाठी गेली १० वर्षे सत्तेत असलेली काँग्रेस जबाबदार असल्याची टीका करत मोदींनी काँग्रेसला हरवत भाजपाला संपूर्ण बहुमत देण्याची मागणी हरयाणाच्या जनतेकडे केली आहे.