Bihar politics: बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, बिहारमधील पश्चिम चंपारणमधील सिक्ता येथे रविवारी माजी मंत्री खुर्शीद आलम यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ते चक्क चप्पलांचा हार घेऊन पोहोचले होते. यावेळी, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना आपल्या कामांचे मूल्यांकन करण्यास खुर्शीद आलम यांनी सांगितले. तसेच, जर काही विकास कामे झाली नाहीत, तर मला हा चप्पलांचा हार घालून सन्मानित करा आणि परत पाठवा, असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम एका शाळेत आयोजित करण्यात आला होता.
मी पाच वर्षे आमदार आणि मंत्री होतो, असे सांगत खुर्शीद आलम यांनी कार्यक्रमादरम्यान आपल्या १० वर्षांच्या कामांबद्दल माहिती दिली. यासोबतच परिसरात झालेल्या विकासकामांची माहितीही खुर्शीद आलम यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान, कामांबद्दल खुश होत कार्यक्रमात उपस्थित लोकांनी खुर्दीश आलम यांचा सत्कार केला.
यावेळी खुर्दीश आलम म्हणाले की, कोणत्याही नेत्याचा सत्कार करण्यापूर्वी त्याचे काम तपासले पाहिजे. ज्यांनी परिसरात विकासकामे केली आहेत, त्यांनाच आदर दिला पाहिजे. दरम्यान, खुर्दीश आलम यांनी आपल्या परिसरात ६४ लहान-मोठी मंदिरे बांधली आहेत. तसेच, खुर्शीद आलम हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.