नवी दिल्ली: नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांचा शुक्रवारपासून सुरू होणारा तीन दिवसीय भारत दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे लक्षवेधक ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींकडून नेपाळमध्ये चिनी कंपन्यांना देण्यात येणाऱ्या धरणांच्या कंत्राटाविषयी नाराजी व्यक्त केली जाऊ शकते. तुम्ही चीनकडून खुशाल हवी तितकी धरणे बांधून घ्या. मात्र, त्याद्वारे निर्माण होणारी वीज आमचा देश विकत घेणार नाही, असे स्पष्ट संकेत मोदींकडून दिले जाऊ शकतात.या सगळ्या प्रकरणाला भारत आणि चीन यांच्यातील सुप्त स्पर्धेची पार्श्वभूमी आहे. भारत आणि चीन दोघांकडून शेजारी देश आपल्या बाजूने कसे राहतील, यासाठी कायम प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या नेपाळमध्ये धरणांचे बांधकाम करण्याचे कंत्राट आपल्या देशातील कंपन्यांना मिळावे, यासाठी दोन्ही देश इच्छूक आहेत. परंतु, नेपाळच्या बुधि गंडकी या नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे कंत्राट चीनच्या गेझोहुबा या कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यात मोदी आणि के.पी. ओली यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी भारताकडून सर्व राजनैतिक संकेत पाळले जातील. परंतु, त्याचवेळी भारताची भूमिका ठोसपणे सांगायलाही पंतप्रधान मागेपुढे पाहणार नाहीत, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.बुधी गंडकी हा २.५ अब्ज डॉलरचा प्रकल्प याच नदीवर उभारण्यात येत असून तोच भारत आणि नेपाळमधील संघर्षांचे प्रमुख कारण आहे. हा प्रकल्प गेल्या जून महिन्यांत चीनच्या गेझोहुबा समूहाला देण्यात आला होता.यापूर्वीही चीनकडून नेपाळमध्ये इंटरनेटसाठी वापरण्यात येणाऱ्या फायबर ऑप्टिक्स केबलचे जाळे पसरण्यात आले होते. तसेच माजी पंतप्रधान प्रचंड यांच्या काळात नेपाळकडून चीनला रस्ते बांधणीचे मोठे कंत्राटही दिले जाणार होते. परंतु, त्यानंतरच्या काळात नेपाळच्या पंतप्रधानपदी देऊबा यांची निवड झाली आणि त्यांनी नोव्हेंबर महिन्यांत हा प्रकल्प रद्द करण्यात आला. या करारात अनियमितता असल्याचे कारण त्यावेळी नेपाळकडून पुढे करण्यात आले होते.
चीनकडून खुशाल धरणं बांधून घ्या, पण आम्ही वीज विकत घेणार नाही; मोदींचा नेपाळला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 09:37 IST