नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आला तर झोपडपट्ट्या नष्ट करेल, असा दावा रविवारी ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजपला सत्ता मिळाल्यास झोपडपट्ट्यांचे कल्याण करण्याऐवजी जमीन संपादनाला प्राधान्य देईल, असे नमूद करत केजरीवाल यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली. दिल्लीतील शकूर बस्ती क्षेत्रात माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी भाजपवर अनेक आरोप केले.
भाजपला सुरुवातीला तुमची मते हवी आहेत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर भाजपला तुमची जमीन हवी आहे. ‘जिथे झोपडी तिथे घर’ ही योजना केवळ दिखावा आहे. गत पाच वर्षांत भाजपने झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी केवळ ४,७०० फ्लॅटची निर्मिती केली. भाजप ही योजना झोपडपट्टीतील नागरिकांच्या जमिनी बळकावण्यासाठी राबवत आहे, असे केजरीवालांनी म्हटले.
निधी संकलन अभियानदिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणुकीसाठी रविवारी स्वत:च्या मतदारसंघात निधी संकलन अभियानाला सुरुवात केली. मतदारसंघातील नागरिक आप पक्षाने केलेली कामे व प्रामाणिकपणाच्या राजकारणाला पाठिंबा देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आपने दिल्ली उद्ध्वस्त केली नवी दिल्ली : सत्ताधारी ‘आप’ने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याएवेजी संपूर्ण शहर उद्ध्वस्त केल्याचा दावा करत रविवारी भाजप नेते हरदीपसिंग पुरी यांनी ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले.
बेरोजगारांना महिना साडेआठ हजार रुपये नवी दिल्ली : दिल्लीत सत्ता मिळाल्यास बेरोजगार युवकांना एक वर्षापर्यंत ‘युवा उडान योजने’अंतर्गत साडेआठ हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन रविवारी काँग्रेस पक्षाने दिले आहे.