मध्य प्रदेशातील भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "मंदिर परिसरात प्रसाद विकणाऱ्यांवर लक्ष ठेवायला हवे आणि जर कुणी बिगर हिंदू प्रसाद वाटताना दिसला तर, त्याला चोप देऊन, नंतर शासनाच्या ताब्यात द्या, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे. त्या रविवारी भोपाळ येथे विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) एका कार्यक्रमात बोलत होत्या.
भाविकांनी 'अशा' विक्रेत्यांकडून प्रसाद खरेदी करू नये -यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हिंदू भाविकांना गट तयार करून मंदिरांच परिसरात प्रसाद कोण विकत आहे, याची तपासणी करण्याचा आग्रह केला. तसेच, भाविकांनी अशा विक्रेत्यांकडून प्रसाद खरेदी करू नये. याशिवाय, त्यांना तो विकण्याची आणि मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये.
घरे 'शस्त्रसज्ज' करण्याच्या विधानाचा पुनरुच्चार -यावेळी त्यांनी, घरे 'शस्त्रसज्ज' करण्याच्या आपल्या पूर्वीच्या विधानाचा पुनरुच्चारही केला. त्या म्हणाल्या, "मी हे म्हटले होते की, तुमच्या घरात शस्त्रे ठेवा. कुटुंबाच्या रक्षणासाठी शस्त्रे धारदार असावीत. शत्रूने तुमच्या घराची चौकट ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचे दोन तुकडे करा."
आपल्या मुली आणि बहिणींवरील अत्याचाराचा संदर्भ देत, "या वेदना दूर करण्यासाठी, शत्रूने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मध्येच कापून काढा," असेही त्या म्हणाल्या. प्रत्येक घरात दुर्गा आणि शत्र ठेवण्याचे आवाहन करणे, हे दुर्गा वाहिनीचे काम असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी विचारधारेचा हवाला देत, सांस्कृतिक परंपरांवर टीका करणाऱ्यांवरही कठोर शब्दांत निशाणा साधला.