PM Modi Bihar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२२ ऑगस्ट २०२५) बिहार दौऱ्यातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या पदावरुन काढून टाकणाऱ्या नवीन विधेयकावरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध असा कायदा आणला आहे, ज्याच्या कक्षेत देशाचे पंतप्रधान देखील येतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही या कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे."
...तर पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना पद सोडावे लागेलपंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, "हा कायदा तयार झाल्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधानांना अटक झाली तर त्यांना ३० दिवसांच्या आत जामीन मिळवावा लागेल आणि जर जामीन मंजूर झाला नाही, तर त्यांना ३१ व्या दिवशी पद सोडावे लागेल. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवायची असेल, तर कोणालाही कारवाईपासून वाचवता कामा नये, असे मला स्पष्टपणे वाटते."
जर एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाऊ शकते, तर पंतप्रधानांना का नाही?नवीन कायद्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा कायदा असा आहे की, जर एखाद्या लहान सरकारी कर्मचाऱ्याला ५० तास कोठडीत ठेवले, तर तो आपोआप निलंबित होतो, परंतु मुख्यमंत्री, मंत्री किंवा पंतप्रधान तुरुंगात असतानाही सत्तेचा आनंद घेऊ शकतो. हा नियम पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना का लागू होऊ नये? आम्ही काही काळापूर्वी पाहिले की, तुरुंगातूनच फायलींवर स्वाक्षरी केली जात होती. तुरुंगातूनच सरकारी आदेश जारी केले जात होते. जर नेत्यांची ही वृत्ती असेल, तर भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कशी लढता येईल?"
राजद-काँग्रेसने जनतेला लुटले - पंतप्रधान मोदीपंतप्रधान मोदींनी राजद आणि काँग्रेसवर जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "काँग्रेस असो वा राजद सरकार, त्यांना कधीच जनतेच्या पैशाचे मूल्य समजले नाही. त्यांच्यासाठी जनतेचा पैसा म्हणजे फक्त त्यांची तिजोरी भरणे आहे. म्हणूनच त्यांच्या सरकारच्या काळात वर्षानुवर्षे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. प्रकल्प जितका जास्त प्रलंबित, तितका जास्त पैसा त्यांना त्यातून मिळायचा. इतक्या वर्षांत आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. मात्र, स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारांकडे त्यांच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी आहे. बिहारमधील प्रत्येक मुलाला राजदच्या भ्रष्टाचाराची माहिती आहे," अशी टीकाही पीएम मोदींनी केली.