उत्तम प्रशासनासाठी आता ‘आयडिया बॉक्स’!
By Admin | Updated: August 28, 2014 02:40 IST2014-08-28T02:40:30+5:302014-08-28T02:40:30+5:30
शासनसंबंधित बाबींवर तोडगा काढण्याकरिता काही अनोख्या सूचना मिळाव्यात या हेतूने सरकारने येथील नॉर्थ ब्लॉकच्या व्हरांड्यात एक आयडिया बॉक्स (सूचना पेटी) ठेवला

उत्तम प्रशासनासाठी आता ‘आयडिया बॉक्स’!
नवी दिल्ली : शासनसंबंधित बाबींवर तोडगा काढण्याकरिता काही अनोख्या सूचना मिळाव्यात या हेतूने सरकारने येथील नॉर्थ ब्लॉकच्या व्हरांड्यात एक आयडिया बॉक्स (सूचना पेटी) ठेवला असून त्यात ज्यांना कुणाला अशा ‘आऊट आॅफ बॉक्स’ सूचना करायच्या आहेत त्यांनी त्या लिहून त्यात टाकाव्यात अशी अपेक्षा आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये कर्मचारी व गृहमंत्रालयांसह अन्य मंत्रालयांची कार्यालये आहेत.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नॉर्थ ब्लॉकमध्ये अशा अनेक पेट्या विविध ठिकाणी लावल्या असून त्याच्या माध्यमातून कर्मचारी, अधिकारी व भेटीला येणाऱ्यांना आपल्या सूचना देता येणार आहेत.
या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने, अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अशा सूचना मंजूषा लावल्या आहेत; मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. या नव्या सूचना पेट्यांमुळे नागरिकांना त्यांच्या सूचना देण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पेट्यांमध्ये टाकलेल्या सूचनांचा विचार गांभीर्याने केला जाईल, असेही ते म्हणाले.
या पेट्या नॉर्थ ब्लॉकच्या तळमजला, पहिला व दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आल्या आहेत. या पेट्या लावण्यामागे, कर्मचाऱ्यांमध्ये नवा जोश निर्माण होऊन त्यांच्याकडून सकारात्मक सूचना घेणे व कामकाजाला अधिक योग्य व दक्षतेने करण्याचे वातावरण निर्माण करणे हा असल्याचे ते म्हणाले.
या उपक्रमासोबत विभागाने कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी गंभीर पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यात प्रत्येक महिन्यात एका कर्मचाऱ्याची निवड करून त्याला उत्तम कामगिरीकरिता प्रशस्तीपत्र देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांसोबत मुक्त चर्चा करण्याची संधी देणे यांचाही समावेश आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)