नवी दिल्ली - राजधानीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आजच्या दिवशी राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कारभारावर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे खासदार साकेत गोखले यांच्यात खडाजंगी झाल्याचं दिसून आले. गृह मंत्रालयाच्या चर्चेत खासदार साकेत गोखले यांनी ईडी, सीबीआयचा मुद्दा उचलून धरत सरकारवर तोफ डागली. तेव्हा शाह यांनी गृह मंत्रालयावर चर्चा होत असताना साकेत गोखले ईडी, सीबीआयवर बोलत आहेत. जर त्यांना हा मुद्दा बोलायचाच असेल तर मलाही संधी मिळेल तेव्हा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन असं अमित शाह यांनी म्हटलं.
शाह यांच्या विधानानंतर खासदार साकेत गोखले यांनी मी बोलायच्या आधीच मंत्री घाबरले असं म्हटलं. त्यावर मी कुणाला घाबरत नाही. कारण मी कुणाच्या कृपेने इथं आलो नाही. मी निवडणूक जिंकून इथं आलोय. कुठल्यातरी विचारधारेचा विरोध करून इथे आलो नाही असा टोला अमित शाहांनी लगावला. साकेत गोखले यांना टीएमसीकडून राज्यसभेत खासदार म्हणून पाठवण्यात आलेत. त्यामुळे शाह यांनी गोखले यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्याशिवाय साकेत गोखले चुकीची माहिती देत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीत झालेल्या हिंसाचारावर गुन्हे दाखल झालेत. ज्याठिकाणी आमच्या जागा आल्या, तिथल्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक एक करून हत्या केली. तक्रारदार हायकोर्टात पोहचले, तिथून सुप्रीम कोर्टात आले. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टीएमसी सुप्रीम कोर्टाला मानत नाही. हायकोर्टाला मानत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं.
राज्यसभेत झाला गोंधळ
सभागृहात भाजपा-टीएमसी यांच्यात गोंधळ उडताच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी साकेत गोखले यांना तुम्ही सभागृहात केलेले विधान मागे घ्या असं सांगितले. त्यावर साकेत गोखले यांनी मी माझे शब्द मागे घेणार नाही. तुमचं नाव अमित शाह आहे त्यामुळे तुम्ही हुकुमशाही करणार असं नाही असं गोखले यांनी म्हणताच भाजपा खासदारांनी गोंधळ घातला. साकेत गोखले यांनी केलेले विधान असंसदीय असून ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी जे.पी नड्डा यांनी केली.
दरम्यान, सत्ताधारी आमच्या सहकाऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत असं टीएमसी खासदार डेरिक ओ ब्रायन यांनी सांगितले. त्यानंतर गृहमंत्री बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतात, हे जातीच्या अपमानावर कसं बोलतात, जर गृह मंत्रालायाने त्यांच्या धोरणात बदल केला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा तडीपार होईल असं साकेत गोखले यांनी म्हटलं.