Nitish Kumar Latest News: नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बिहारचे राजकारणाची दिल्लीसह देशभरात चर्चा सुरू झालीये. लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ऑफर दिली आणि सगळ्यांच्या नजरा नितीश कुमारांकडे वळल्या. तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांची भेट झाली, त्यानेही चर्चेला हवाच दिली. या सगळ्यानंतर अखेर नितीश कुमार यांनी मौन सोडलं. माध्यमांशी बोलताना नितीश कुमार यांनी राजद-जदयू आघाडीच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्यावर भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लालू प्रसाद यादव यांच्या ऑफरवर बोलताना नितीश कुमार म्हणाले की, "मी दोन वेळा चुकीने इकडे-तिकडे गेलो होतो, आता आम्ही लोक (जदयू-भाजप) नेहमी सोबत राहू आणि विकासाचे काम करत राहू."
लालू प्रसाद यादव यांनी काय दिली होती ऑफर?
नवीन वर्षाच्या निमित्ताने बोलताना १ जानेवारी रोजी लालू प्रसाद यादव यांनी एक विधान केले होते. "नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजा तर उघडा आहे. नितीश कुमारांनीही दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. नितीश कुमार सोबत येत असतील, का सोबत घेणार नाही? सोबत घेऊ", असे लालू प्रसाद यादव म्हणाले होते.
"नितीश कुमारांनी सोबत यावे आणि काम करावे. नितीश कुमार पळून जातात. आम्ही माफ करू", असेही लालू प्रसाद यादव म्हणाले होते.
नितीश कुमारांच्या मौनामुळे चर्चांना मिळाले होते बळ
लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या या विधानामुळे बिहारच्या राजकारणात भूकंप होणार का? या प्रश्नाभोवती चर्चेने फेर धरला. महत्त्वाचं म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार हे मात्र मौन बाळगून होते. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीकडे जाताहेत का? अशी शंकाही उपस्थित होऊ लागली होती.