अमेरिकेने H-1B व्हिसावर 1 लाख डॉलर (सुमारे 90 लाख रुपये) एवढे शुल्क लावल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी शनिवारी (20 सप्टेंबर 2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा "कमकुवत पंतप्रधान" म्हणून संबोधले आहे. त्यांनी 2017 मधील आपली एका एक्स पोस्ट शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्या पोस्टमध्येही त्यांनी पंतप्रधान मोदी कमकुवत असल्याचा आरोप केला होता. यावेळीही, "मी पुन्हा सांगतो की, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान आहेत," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, "अमेरिका पहिल्यांदाच भारताशी असे वागत आहे असे नाही. आपले परराष्ट्र धोरणं कमकुवत आहे. यापुढे इतर देशांनीही असे केले, तर आपली काय तयारी आहे? आपला देश आर्थिकदृष्ट्या जेवढा बळकट असायला हवा, तेवढा दिसत नाही. इतर देशांवरील आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. खते आणि इतर गोष्टींसाठीही आपण इतर देशांवरच अवलंबून आहोत. ज्या देशाशी आपला सीमा वाद आहे, त्यांच्याशी आपण व्यापार वाढवत आहोत."
दरम्यान, आम आदमी पक्षाचे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनीही मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले, "H-1B व्हिसावर अमेरिकेत काम करणारे 71% लोक भारतीय आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हिसाची किंमत 1 लाख डॉलर केली आहे, जेणेकरून कंपन्यांना भारतीयांना नोकरी देणेच कठीण होईल." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका आदेशावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे H-1B व्हिसासाठी 1 लाख डॉलर शुल्क न भरलेल्या कामगारांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.