Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर आपल्या पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने अनेकदा चर्चेत असतात. पण, आपण कधीही पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलो नसल्याचे त्यांनी आता स्पष्ट केले आहे. मी गेली 17 वर्षे पक्षात आहे आणि सहकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरसमज असू नये, असे ते म्हणाले.
केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सुलतान बाथरी येथे आयोजित ‘मिशन 2026’ नेतृत्व शिबिरानंतर थरुर पत्रकारांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
पक्षाच्या भूमिकेशी विसंगती नाही
आपल्या अलिकडील विधानांमुळे आणि लेखांमुळे पक्षाला अडचणीत टाकले गेल्याच्या आरोपांवर थरूर म्हणाले, कोण म्हणतं मी पक्षाच्या विचारधारेचे उल्लंघन केले? विविध विषयांवर मी मत व्यक्त केले आहे, मात्र बहुतेक प्रकरणांत पक्ष आणि माझी भूमिका सारखीच राहिली आहे.
माझ्या पोस्टवर वाद का होतात?
संसदेत मंत्र्यांना विचारलेले प्रश्न ठरावीक दिशेचे होते आणि त्यावरुन पक्षाने अस्वस्थ होण्याचे कारण नाही. वाद बहुतांश वेळा तेव्हाच निर्माण होतात, जेव्हा माध्यमे संपूर्ण मजकूर न वाचता केवळ मथळ्यांवरुन निष्कर्ष काढतात. मी लोकांना विचारतो की, त्यांनी माझे लिखाण पूर्ण वाचले आहे का? बहुतांश वेळा उत्तर ‘नाही’ असेच असते. संपूर्ण मजकूर वाचल्यानंतरच खरा मुद्दा समजतो.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यानंतर हे मुद्दे निर्माण झाले का? या प्रश्नावर थरूर म्हणाले, काँग्रेस पक्ष लोकशाही परंपरांचे पालन करतो. मी निवडणूक लढवली आणि हरलो, मुद्दा तिथेच संपला.
आडवाणी आणि मोदींबाबतच्या वक्तव्यांवर खुलासा
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पणीबाबत थरूर म्हणाले, ते त्यांच्या 98व्या वाढदिवसानिमित्त शिष्टाचाराचा भाग होता. आपल्या संस्कृतीत ज्येष्ठांचा सन्मान करायला शिकवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कौतुक केल्याच्या आरोपांवर थरुर म्हणाले, मी केवळ एका सार्वजनिक कार्यक्रमातील वक्तव्य केले होते. माझ्या पोस्टचा पूर्ण मजकूर वाचल्यास त्यात प्रत्यक्ष कौतुक नसल्याचे स्पष्ट होईल.
Web Summary : Shashi Tharoor clarifies he hasn't strayed from Congress ideology despite differing views. He emphasized strong relationships within the party and addressed controversies surrounding his statements on leaders.
Web Summary : शशि थरूर ने स्पष्ट किया कि वे अलग विचारों के बावजूद कांग्रेस विचारधारा से नहीं भटके हैं। उन्होंने पार्टी के भीतर मजबूत संबंधों पर जोर दिया और नेताओं पर अपने बयानों से जुड़े विवादों को संबोधित किया।