मी माझा एकुलता एक मुलगा देशाला दिला
By Admin | Updated: February 21, 2016 18:37 IST2016-02-21T18:14:18+5:302016-02-21T18:37:08+5:30
कॅप्टन पवन कुमार योगायोगाने सध्या देशामध्ये ज्या दोन घटनांवरुन रस्त्यावर आंदोलने सुरु आहेत त्याच्याशी संबंधित होते.

मी माझा एकुलता एक मुलगा देशाला दिला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - जम्मू-काश्मीरच्या पाम्पोरमध्ये रविवारी अतिरेक्यांशी दोन हात करताना कॅप्टन पवन कुमार शहीद झाले. ते अवघे २२ वर्षांचे होते. कॅप्टन पवन कुमार योगायोगाने सध्या देशामध्ये ज्या दोन घटनांवरुन रस्त्यावर आंदोलने सुरु आहेत त्याच्याशी संबंधित होते.
कॅप्टन पवन कुमार हे आरक्षणासाठी हिंसक आंदोलन सुरु असलेल्या हरयाणातील जिंद जिल्ह्यातील जाट आहेत तसेच ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील पदवीधारक आहेत. पाम्पोरमध्ये सरकारी इमारतीमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी दोन हात करताना कॅप्टन पवन कुमार शहीद झाले.
कारवाई दरम्यान आघाडीवर राहून नेतृत्व करत असताना अतिरेक्यांच्या गोळया लागून त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर कॅप्टन पवनकुमार यांचे पिता राजबीर सिंग यांनी मला एक मुलगा होता, मी तो लष्कराला, देशाला दिला अशी प्रतिक्रिया दिली.
लष्कर दिनाच्या दिवशी पवन कुमार यांचा जन्म झाला होता. ते लष्करात जाणार हे त्याच्या नशिबात होते असे राजबीर सिंग म्हणाले. यापूर्वी अतिरेक्यांविरुध्दच्या दोन यशस्वी मोहिमांमध्ये पवन कुमार सहभागी होते अशी माहिती लष्करी अधिका-यांनी दिली.
१५ जानेवारी १९९३ रोजी लष्कर दिनी पवन कुमार यांचा जन्म झाला. १४ डिसेंबर २०१३ मध्ये ते लष्कराच्या सेवेत दाखल झाले. १० पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये असणारे कॅप्टन पवन कुमार यांचा लष्करातील सेवाकाळ तीन वर्षांपेक्षाही कमी होता.