राजकारणी म्हणून मी अपयशी - अमिताभ बच्चन
By Admin | Updated: September 16, 2016 13:04 IST2016-09-16T13:04:14+5:302016-09-16T13:04:14+5:30
राजकारणात असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य अजूनही जाणवत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे

राजकारणी म्हणून मी अपयशी - अमिताभ बच्चन
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - राजकारणात असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य अजूनही जाणवत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांची अलाहाबादचा खासदार अशी एक छोटीशी राजकीय कारकिर्द झाली. मात्र, अलाहाबादच्या जनतेच्या अपेक्षा खासदार म्हणून आपण पूर्ण करू शकलो नाही याची खंत अजूनही मनातून जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अत्यंत जुने मित्र असलेल्या राजीव गांधींच्या प्रेमाखातर बच्चन यांनी निवडणूक लढवली. प्रचंड मताधिक्याने ते निवडूनही आले. मात्र, तीनच वर्षांत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. निवडणूक लढवताना तुम्ही जनतेला खूप आश्वासनं देता आणि आता मागे वळून बघताना, ती आश्वासनं मी पूर्ण करू शकलो नाही हे आठवतं, असं ते म्हणाले आहेत.
मी साजाजिक जीवनात शक्य तेवढं काम केलं आहे, परंतु अलाहाबादच्या जनतेच्या मनात मात्र मी न केलेलं काम राहील असं ते म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. मला राजकारणी म्हणून राहणं शक्य नव्हतं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणून मी राजकारण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे.
माझं काम कॅमेऱ्यासमोर जाणं, आणि उत्कृष्ट आहे ते सादर करणं हे आहे, आणि मला त्यावरून लक्ष विकेंद्रीत करायचं नाहीये असं बच्चन म्हणाले. अमेरिकेमध्ये हॉलीवूडमधले कलाकार उघड उघड राजकीय भूमिका घेतात, ते तसं करू शकतात कारण अमेरिकेतले प्रेक्षक हे जास्त प्रगल्भ आहेत, असं मत त्यांनी नोंदवलं आहे. हॉलीवूडचे प्रेक्षक खूप प्रगल्भ आहेत, आपल्याकडे थोडी मर्यादा आहे. मी काँग्रेसचा प्रचार करत असताना, चुकून विरोधकांच्या कार्यक्रमस्थळी गेलो तर तिथल्या तरूणांनी मला सांगितलं की आम्ही तुमचे चाहते आहोत, परंतु तुम्ही ताबडतोब इथून निघून जा. लोकांनी कलाकारांवर प्रेम केलं म्हणजे त्यांच्या राजकारणावरही प्रेम करायला पाहिजे असं नाही, अशी पुस्तीही बच्चन यांनी जोडली.