Mamata Banerjee News: इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा उल्लेख न करता नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूक निकालात इंडिया आघाडीची मानहानीकारक हार झाली. त्यानंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडूनच इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल नाराजी सूर उमटण्यास सुरूवात झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी याबद्दल मोठे विधान केले असून, मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला तयार आहे, असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जींचं विधान काँग्रेससाठी मेसेज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
न्यूज१८ बांगला वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवरून काँग्रेसबद्दल खंत व्यक्त केली.
इंडिया आघाडी मी स्थापन केली -ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती चालवण्याची जबाबदारी आहे. ते जर हे व्यवस्थित करत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी फक्त इतकंच म्हणेन की, सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल."
"...तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करेन"
भाजपविरोधात एक मजबूत शक्ती म्हणून तुमची ओळख आहे, मग तुम्ही इंडिया आघाडीचे नेतृत्व का करत नाही आहात? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, "जर मला संधी मिळाली, तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करेन. बंगालच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा नाहीये, पण मी इथून इंडिया आघाडी चालवू शकते", असे उत्तर त्यांनी दिले.
भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. दोन डझनपेक्षा जास्त पक्ष आघाडीमध्ये आहेत. मात्र, अंतर्गत मतभेद आणि असमन्वयामुळे इंडिया आघाडीला दोन निवडणुकीत फटका बसला आहे. त्यामुळे आघाडीच्या नेतृत्वावर टीका होत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा काँग्रेसला टोला
ममता बॅनर्जी यांचे विधान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विधानानंतर आले आहे. कल्याण बॅनर्जी म्हणाले आहेत की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आपला अंहकार बाजूला ठेवायला हवा. ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षाच्या आघाडीच्या नेत्या म्हणून मान्यता द्यायला पाहिजे, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले.