बाबा बागेश्वर अर्थता बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानात जन्मलेले आरिफ अजाकिया यांच्यातील संवाद आहे. हा व्हायरल व्हिडिओ ब्रिटनमधील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका कार्यक्रमातील असल्याचे बोलले जात आहे. यात पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी आरिफ आजाकिया यांच्या प्रश्नाचे असे उत्तर दिले की, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या व्हायरल व्हिडिओमध्ये मोहम्मद आरिफ आजाकिया म्हणतात, "माझे नाव मोहम्मद आरिफ आजाकिया आहे, माझा जन्म पाकिस्तानात झाला. माझे पालक भारतीय होते ते १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात आले. माझा एक छोटासा प्रश्न आहे की, तुम्ही सर्वजण नशीबवान आहात की, तुम्ही सर्वजण सनातनमध्ये जन्माला आला आहात. मी मुस्लिम कुटुंबात जन्मलो मात्र, भगवद्गीता वाचल्यानंतर हिंदू झालो. मला एक प्रश्न विचारला जातो की, तुमचे नाव मोहम्मद आरिफ आजाकिया आहे, मग तुम्ही हिंदू कसे असू शकता? हिंदू होण्यासाठी नाव बदलणे आवश्यक आहे का? लोक म्हणतात की नाव बदला."
अजाकिया पुढे म्हणाले, "तुम्हाला माहितीच आहे की नाव बदलण्यात किती समस्या येतात. मुलांच्या जन्माच्या दाखल्यांसह अनेक ठिकाणी नावे बदलावी लागतात. तर नाव बदलणे आवश्यक आहे का? नाव न बदलता मी हिंदू राहू शकत नाही का? आपण म्हणालात की भारतीय म्हणून राहा, मग पाकिस्तानात जन्मलेला माणूस जर मनाने हिंदुस्तानी असेल तर तो भारतीय राहू शकत नाही का?"
आजकिया यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात, "हिंदुत्व हा धर्म नाही. तो मानवतेचा विचार आहे. मानवतेच्या विचारसरणीसाठी, आम्हाला तुमच्या रंगाशी, तुमच्या दिसण्याशी अथवा तुमच्या देशाशी काही देणे घेणे नाही. जर तुम्ही भगवद्गीता वाचत असाल, तिचे अनुसरण करत असाल, तर तुमचे नाव काहीही असो, तुमची ओळख काहीही असो, आम्ही रहीम रासखान यांचेही गीत गातो आणि जेव्हा जेव्हा देशाचा मुद्दा येतो. तेव्हा आम्ही अब्दुल कलाम यांनाही सॅल्यूट करतो."
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, "जर तुम्ही स्वतःला हिंदू मानत असाल, तर आमच्यासाठी एवढेच पुरेसे आहे. तुम्ही नाव बदला अथवा न बदला, जर तुमच्या मनातील विचार बदलले असतील, तर तुम्ही आमचे झाला आहात." तसेच, "दुसरा प्रश्न आपण विचारलात की, आपला जन्म भारतात झाला नाही, तर पाकिस्तानी भारतीय असू शकत नाही का? सत्य तर असे आहे की, पाकिस्तान देखील आमचाच आहे. १९४७ पूर्वी तुम्ही आमचे होता. फाळणीनंतर एक भिंत बांधली गेली, पण आजही तुम्ही पाकिस्तानीं लोकांचे हृदय कापले तर फक्त भारतीयच निघेल," असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.