पासपोर्टसाठी म्हणालो ‘मी भारतीय’ -गिलानी

By Admin | Updated: June 6, 2015 00:15 IST2015-06-06T00:15:45+5:302015-06-06T00:15:45+5:30

फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी शुक्रवारी पासपोर्ट अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहून आपल्या प्रवास दस्तऐवजांची औपचारिकता पूर्ण करतानाच स्वत:ला एक भारतीय म्हणून घोषित केले;

I asked for the passport 'I am Indian' - Gilani | पासपोर्टसाठी म्हणालो ‘मी भारतीय’ -गिलानी

पासपोर्टसाठी म्हणालो ‘मी भारतीय’ -गिलानी

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी शुक्रवारी पासपोर्ट अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहून आपल्या प्रवास दस्तऐवजांची औपचारिकता पूर्ण करतानाच स्वत:ला एक भारतीय म्हणून घोषित केले; परंतु त्याचवेळी स्वत:ला भारतीय घोषित करण्यासाठी आपण बाध्य असल्याचे सांगण्यास मात्र ते विसरले नाहीत.
‘गिलानी यांनी निर्धारित कक्षावर आपला बायोमेट्रिक डाटा-बोटांचे ठसे आणि इरिस स्कॅन दिले’, अशी माहिती प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. कट्टरवादी हुरियत कॉन्फरन्सचे ८८ वर्षीय नेते गिलानी हे आपल्या आजारी असलेल्या कन्येच्या भेटीसाठी सौदी अरेबियाला जाऊ इच्छितात. गिलानी हे सकाळी १०.१५ वाजता पासपोर्ट सेवा केंद्रात पोहोचले. गिलानी यांनी राष्ट्रीयत्वाच्या रकान्यात ‘भारतीय’ असे लिहिल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. पासपोर्ट कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर गिलानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी जन्मत: भारतीय नाही. भारतीय असा उल्लेख करणे ही माझी विवशता आहे,’ असे ते म्हणाले.
हुरियतच्या प्रवक्त्याने गिलानींच्या कृतीचे समर्थन केले आहे. प्रत्येक काश्मिरी नागरिकासाठी भारतीय पासपोर्टवर विदेश प्रवास करणे ही विवशता आहे. त्यामुळे गिलानी यांनाही स्वत:ला भारतीय घोषित करण्यास बाध्य व्हावे लागले, असे हा प्रवक्ता म्हणाला. (वृत्तसंस्था)
गिलानी यांना पासपोर्ट जारी करण्याच्या मुद्यावरून राजकीय वादंग माजले होते. गिलानी यांनी स्वत:ला आधी भारतीय घोषित करावे आणि भारतविरोधी कारवायांबद्दल माफी मागावी, अशी मागणी करून भाजपने त्यांना पासपोर्ट जारी करण्याला विरोध दर्शविला होता; परंतु भाजपचा मित्रपक्ष असलेल्या पीडीपीने मात्र गिलानींना पासपोर्ट जारी करण्याचे समर्थन केले होते. गिलानींचा पासपोर्ट अर्ज अपूर्ण आहे आणि त्यामुळे तो मंजूर केला जाऊ शकत नाही, असे गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: I asked for the passport 'I am Indian' - Gilani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.