पतीचे अनैतिक संबंध म्हणजे छळ नाही - सुप्रीम कोर्ट
By Admin | Updated: February 19, 2015 10:56 IST2015-02-19T10:15:42+5:302015-02-19T10:56:13+5:30
पतीचे दुस-या महिलेशी असलेले अनैतिक संबंध हा त्याच्या पत्नीचा छळ ठरु शकत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे.

पतीचे अनैतिक संबंध म्हणजे छळ नाही - सुप्रीम कोर्ट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पतीचे दुस-या महिलेशी असलेले अनैतिक संबंध हे त्याच्या पत्नीसाठी मानसिक छळ ठरु शकत नाही असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. पतीचे अनैतिक संबंध हे पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे कारण ठरु शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकालही सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
गुजरातमधील एका प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हे मत मांडले. गुजरातमध्ये राहणा-या संबंधीत दाम्पत्त्यामधील संबंध ताणले गेले होते. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यावरुन त्याचा पत्नीशी वाद व्हायचा. या दाम्पत्त्याने घटस्फोट घेण्याचा विचारही केला होता. मात्र त्याची पत्नी निराश झाली व तिने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालय व हायकोर्टानेही महिलेच्या पतीला दोषी ठरवले होते.
हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आरोपी पतीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाचे न्या. एस.जे. मुखोपाध्याय व दिपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर आपला निकाल दिला. 'पतीचे अनैतिक संंबंध असल्याने त्याची पत्नी निराश होती. यातूनच तिने आत्महत्या केली.मात्र यामुळे आरोपी आयपीसीतील कलम ४९८ (अ) अंतर्गत दोषी ठरु शकत नाही असे कोर्टाने स्पष्ट केले. अनैतिक संबंधांचे काही पुरावे आहेत व ते सिद्ध झाले तरी याचिकाकर्ता कलम ४९८ अ अंतर्गत मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरु शकत नाही असे कोर्टाने म्हटले आहे.