जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू, भाजपा दुस-या स्थानावर

By Admin | Updated: December 23, 2014 20:46 IST2014-12-23T20:09:22+5:302014-12-23T20:46:07+5:30

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी २८ जागांसह अव्वल क्रमांकावर पोहोचला असून भाजपाने २५ जागांवर विजय मिळवला आहे.

Hunger in Jammu Kashmir, BJP at second position | जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू, भाजपा दुस-या स्थानावर

जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू, भाजपा दुस-या स्थानावर

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.२३ - जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली 'मिशन ४४ प्लस' हे ध्येय गाठण्यात अपयश आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी २८ जागांसह अव्वल क्रमांकावर पोहोचला असून भाजपाने २५ जागांवर विजय मिळवला आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेच्या ८७ जागांसाठी टप्पाटप्प्यात मतदान झाले. दहशतीच्या सावटाखाली वावरणा-या काश्मीरी जनतेने बुलेटला बॅलेटने उत्तर देत विक्रमी मतदान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काश्मीर दौरे, पूरग्रस्त परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. मंगळवारी मतमोजणी पार पडली असून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. पीडीपी २८ जागांवर विजयी झाली असून सत्ता स्थापनेसाठी पीडीपी हा प्रमुख दावेदार ठरला आहे. भाजपाने गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाचा चांगली कामगिरी करत तब्बल २५ जागांवर विजय मिळवला आहे. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ११ जागा मिळाल्या होत्या. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला आहे. या पक्षाला अवघ्या १५ जागांवर विजय मिळाला आहे.  काँग्रेसला १२ आणि अन्य पक्षांना सात जागांवर विजय मिळाला आहे.  

काय अशू शकतो सत्ता स्थापनेचा फॉर्म्यूला ? 

जम्मू काश्मीरमध्ये बहुमतासाठी ४४ जागा आवश्यक आहे.

> पीडीपीकडे २८ जागा असून त्यांना भाजपाची (२५ जागा) साथ घेऊन मॅजिक फिगर गाठणे शक्य आहे.

> पीडीपी, काँग्रेस (१२), अन्य पक्ष (सहा जागा) यांना सोबत घेऊन सत्तास्थापन करु शकते.

 नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनीही मुफ्तींना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहे. यानुसार पीडीपी २८ आणि नॅशनल कॉन्फरन्सचे १५ मिळून ४३ असे संख्याबळ होते. काँग्रेस व अन्य पक्षांच्या मदतीने पीडीपीला सत्तास्थापन करणे शक्य आहे. मात्र पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याने मुफ्ती यासाठी तयार होतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

> भाजपाने सत्तास्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले असले तरी ते कोणासोबत जातील याचे उत्तर देणे त्यांनी टाळले आहे. भाजपा, नॅशनल कॉन्फरन्स व अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपाला सत्तास्थापन करणे शक्य होईल. मात्र यासाठी भाजपाला अथक मेहनत घ्यावी लागेल व ही जुळवाजुळव कितपत यशस्वी होईल याबाबतही शंकाच आहे. 

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांना पराभवाचा धक्का

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभवाचा  धक्का बसला आहे. सोनावर या मतदारसंघात पीडीपीच्या अशरफ मीर यांनी अब्दुल्ला यांचा पराभव केला. तर बीरवाह मतदारसंघातून अवघ्या हजार मतांनी विजय नोंदवत अब्दुल्लांना अब्रू वाचवण्यात यश आले आहे.  
 
खो-यात भाजपाची नाचक्की
भाजपाला २५ जागांवर यश मिळाले असले तरी या सर्व जागा हिंदूबहूल जम्मूतील आहे. काश्मीर खो-यात भाजपाने लढवलेल्या ३४ पैकी एकाही जागेवर पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवता आलेला नाही. दुर्दैवी बाब म्हणजे यातील बहुसंख्य ठिकाणी भाजपा उमेदवाराचे डिपोझीटही जप्त झाले. निवडणुकीत पक्षाचा चेहरा बनलेल्या युवा नेत्या हिना बट यांचाही पराभव झाला. 
 
भाजपाच्या मुस्लिम उमेदवाराचा पहिल्यांदाच विजय
जम्मू काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाच्या तिकीटावर एका मुस्लिम उमेदवाराचा विजय झाला. कालाकोट येथे भाजपाचे उमेदवार अब्दूल गनी कोहली यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार रशपाल सिंह यांचा पराभव केला.  
 
 

Web Title: Hunger in Jammu Kashmir, BJP at second position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.