‘हुडहुड’ने झाले कोट्यवधींचे नुकसान
By Admin | Updated: October 15, 2014 01:44 IST2014-10-15T01:44:32+5:302014-10-15T01:44:32+5:30
विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली

‘हुडहुड’ने झाले कोट्यवधींचे नुकसान
विशाखापट्टणम : विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली. या पार्श्वभूमीवर वादळग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केली.
एकट्या इस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी आॅफ आंध्र प्रदेश लिमिटेडचेच ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. यात उपकेंद्रे, उच्चक्षमता असलेली पारेषण लाईन, विजेचे खांब आणि वितरणाचे जाळे आदींचा समावेश आहे. चक्रीवादळाने सुमारे १६ हजार विजेचे खांब कोसळले असून जवळपास ६ हजार ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय पोलाद निगम लिमिटेड (विजाग स्टील प्रकल्प) ला अंदाजे एक हजार कोटी, भारतीय नौसेनेला दोन हजार कोटी, आंध्र विद्यापीठाला ३०० कोटी तर विजाग विमानतळाला ५०० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे नायडू यांनी सांगितले.
मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी ते स्वत:
येथे हजर आहेत. ते म्हणाले, विजाग पोलाद प्रकल्पाचे दरदिवसाला ३० ते ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ते सुरळीत व्हायला आणखी १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. भूपृष्ठ वाहतुकीचे जवळपास ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)