गुन्हेगारीचा टिळा घेऊन किती जाणार लोकसभेत?
By Admin | Updated: May 12, 2014 04:42 IST2014-05-12T04:42:49+5:302014-05-12T04:42:49+5:30
एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नको, असे दावे सगळ्याच पक्षांकडून करण्यात येतात. परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी काही झाल्याचे दिसून आले नाही.

गुन्हेगारीचा टिळा घेऊन किती जाणार लोकसभेत?
१३९८ रिंगणात : २२०८ उमेदवार कोट्यधीश
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुका निरनिराळ्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. ज्याप्रमाणे मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली, अगदी त्याचप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराच्या संख्येतदेखील वाढ झाली. देशभरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १३९८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यातील किती उमेदवार लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद भवनात दाखल होतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले. याशिवाय २२०८ कोट्यधीश उमेदवारदेखील रिंगणात होते. ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने निवडणूक लढणार्या एकूण ८२३० पैकी ८१६३ उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. गेल्या लोकसभा निवडणुकांत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ११५८ उमेदवार रिंगणात होते. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मोठे पक्ष आघाडीवर
एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नको, असे दावे सगळ्याच पक्षांकडून करण्यात येतात. परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी काही झाल्याचे दिसून आले नाही. काँग्रेसच्या ४६२ पैकी १२८, तर भाजपाच्या ४२६ पैकी १४० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. ‘आप’च्या ४२७ पैकी ६५ तर बसपाच्या ५०१ पैकी ११४ उमेदवारांवर प्रकरणे दाखल आहेत. ३१८२ अपक्ष उमेदवारांपैकी ३०७ जणांनी शपथपत्रात गुन्हे दाखल असल्याचे मान्य केले आहे. ६०८ उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत, तर ५७ उमेदवारांवर हत्या केल्याचा आरोप आहे.