देशविरोधी बोलण्याची हिंमतच कशी होते?, संरक्षणमंत्र्याने आमीर खानला फटकारले
By Admin | Updated: July 31, 2016 13:52 IST2016-07-31T13:18:17+5:302016-07-31T13:52:54+5:30
देशाच्या विरोधात बोलणा-यांना धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खान याला नाव न घेता सुनावले आहे.

देशविरोधी बोलण्याची हिंमतच कशी होते?, संरक्षणमंत्र्याने आमीर खानला फटकारले
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१: देशाच्या विरोधात बोलणा-यांना धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खान याला नाव न घेता सुनावले आहे. देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच कशी होते असा सवालही मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित केला. पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) आणि भारतशक्ती डॉट इन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यांनी लिहिलेल्या सियाचिन: धगधगते हिमकुंड या पुस्तकाचे प्रकाशन मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
आमिर खान याने देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांचा उल्लेख करत देश सोडण्याचे विचार घोळत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमिरवर टीकेची झोड उठली होती. तसेच तो ज्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची जाहिरात करत होता, त्या कंपनीवरही अनेकांनी बहिष्कार टाकला होता.
मनोहर पर्रिकर यांनी म्हटले की, एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीला देश सोडून बाहेर जायचं असल्याचं सांगितलं. हे अत्यंत उर्मट वक्तव्य होतं. मात्र, नागरिकांनी त्याला योग्य उत्तर दिलं. तो अभिनेता जाहिरात करत अलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला तर काही कंपन्यांनी त्याला ब्रँड अँबेसेर पदावरुन हटविले. यामुळे देशविरोधी वक्तव्य करणा-यांना लोकच धडा शिकवतील असेही मनोहर पर्रिकर यांनी म्हटले.