गृहिणींनीही कंबर कसली!
By Admin | Updated: September 22, 2014 09:48 IST2014-09-22T05:00:56+5:302014-09-22T09:48:46+5:30
निवडणुकीसाठी प्रत्येकच जण लगिनघाईत असताना घरोघरीच्या गृहिणी मागे कशा राहतील? त्यामुळेच आता उमेदवारांनी गृहिणींना 'टार्गेट' केले

गृहिणींनीही कंबर कसली!
मुंबई : निवडणुकीसाठी प्रत्येकच जण लगिनघाईत असताना घरोघरीच्या गृहिणी मागे कशा राहतील? त्यामुळेच आता उमेदवारांनी गृहिणींना 'टार्गेट' केले असून, त्यांना प्रचारासाठी विविध पातळीवर प्रशिक्षण दिले जात आहे. 'गॉसिपिंग'मध्ये आघाडीवर असणार्या गृहिणी वर्गाच्या माध्यमातून काना-कानात प्रचाराचा आवाज घुमेल याची काळजी राजकीय पक्ष घेत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीसाठीही गृहिणीही कंबर कसत असून दुपारच्या रिकाम्या वेळात राजकीय पक्षांसाठी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जोमाने काम करत आहेत.
चाकरमानी, तरुणपिढीसोबत आता गृहिणींनीही प्रचारकामात उडी घेतल्याने विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी गृहिणींना मोफत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. त्यात संगणक प्रशिक्षण, सोशल नेटवर्किंग साइ्टस हाताळणे, बल्क मेसेजिंग आणि माऊथ पब्लिसिटीचा समावेश आहे. घरकामे आवरल्यानंतर दुपारच्या वेळेत गृहिणींसाठी या विशेष वर्गांचे आयोजन केले जात आहे.
घराघरांतील गृहिणींमध्ये 'तुमच्याकडे भाजी कोणती?', 'आज बाजारात येणार का?' याऐवजी गृहिणींमध्ये जागावाटपाचा तिढा, उमेदवारांवर टिका-टिप्पणी आणि आघाडीत बिघाडी यावर चर्चा रंगताना दिसत आहे. या चर्चेमुळे घराघरात राजकीय रंग चढला असून, एकूणच निवडणुकीचीच चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात 'चूल आणि मूल' याचे बंधन झुगारून आता गृहिणीही प्रचारसभा, रॅली आणि पदयात्रांमध्येही आघाडीवर असतील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)