तासगावातील पराभव जिव्हारी

By Admin | Updated: November 6, 2014 04:01 IST2014-11-06T04:01:49+5:302014-11-06T04:01:49+5:30

गंभीर दखल घेणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी तासगावच्या पराभवाची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे.

Hour-wise defeat | तासगावातील पराभव जिव्हारी

तासगावातील पराभव जिव्हारी

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तासगावची सभा टाळूनही भाजपाने राजकीय लक्ष्य बनविलेले राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा झालेला विजय भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. परिणामी त्याची गंभीर दखल घेणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी तासगावच्या पराभवाची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधानांसह भाजापाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाची ताकद कुठे कमी पडली व खा. संजयकाका पाटील यांनी नेमके काय केले याबाबतचा स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे. मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत तासगावच्या पराभवावर चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले. या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याची सूचना स्वत: पंतप्रधानांनी केल्याने सांगलीचे खासदार संजयकाका पाटील पक्षीय रडारवर आले आहेत.
महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना भाजपाला धडा शिकवायचा होता, त्या यादीत ‘आरआर’ यांचे नाव अव्वल होते. विशेष म्हणजे खा. पाटील यांनी आबांंच्या पराभवाची खात्री पक्षाला दिली होती. त्यानंतर, खा. पाटील यांना पक्षाने फक्त तासगाववरच लक्ष्य केंद्रित करण्याची मुभा दिली होती. त्याबरहुकूम खा. पाटील हे अन्य कोणत्याच मतदारसंघात फिरकलेही नाहीत. पंतप्रधान मोदी यांची सभा थेट तासगावमध्येच घेण्यात आली. आबांच्या पराभवासाठी संजयकाकांच्या सूचनेनुसार पक्षाने सारी राजकीय अस्त्रे वापरली होती. पण शेवटी भाजपा उमेदवार अजित घोरपडे यांचा दारुण पराभव झाला.

Web Title: Hour-wise defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.