हॉटेल्स हाऊसफुल्ल; ‘आप’ कार्यकर्त्यांची रीघ

By Admin | Updated: February 14, 2015 00:48 IST2015-02-14T00:48:29+5:302015-02-14T00:48:29+5:30

अरविंद केजरीवाल यांच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झालीे

Hotels Housefool; 'AAP' workers | हॉटेल्स हाऊसफुल्ल; ‘आप’ कार्यकर्त्यांची रीघ

हॉटेल्स हाऊसफुल्ल; ‘आप’ कार्यकर्त्यांची रीघ

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झालीे असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे.
पहाडगंज, करोलबागमधील हॉटेल्सचे सर्वसाधारण दर ५०० ते १२०० रुपये असून दिल्लीला भेटी देणारे पर्यटक स्वस्त दरांमुळे या भागातील हॉटेल्सला पसंती देत असतात, पण गेल्या दोन दिवसांत दर २५०० वर गेले आहेत.
सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे हॉटेल्सचे दर ५०० ते ७०० रुपयांच्या घरात होते, मात्र अचानक गेल्या दोन दिवसांत भाव घसघशीत वाढले आहेत. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवासाची पक्षाने व्यवस्था केलेली नसून ती त्यांनी स्वत:च करावी असे सांगण्यात आले आहे. नेमके किती कार्यकर्ते येतील याचा अंदाज लावता येणे अशक्य आहे. देशभरातून किमान २० हजारांवर कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा असल्याचे आपच्या एका नेत्याने सांगितले.
राष्ट्रपती राजवट मागे
केंद्राने शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दिल्लीतील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केली . आयोगाने नवनिर्वाचित आमदारांची यादी जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. गेल्यावर्षी केजरीवालांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
४० हजार लोकांची व्यवस्था...
शपथविधीसाठी सुमारे ४० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून व्हीआयपींसाठी खास दीर्घा बनविण्यात आल्या आहेत. मैदानावर सर्वत्र मोठ्या स्क्रीनवर कार्यकर्त्यांना शपथविधी सोहळा बघता येऊ शकेल. याआधी २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवालांच्या शपथविधीला एक लाखावर लोक आले होते. गेल्यावर्षी १४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे केजरीवालांच्या पहिल्या शपथविधीचा वार शनिवारच होता.
संपूर्ण दिल्ली ‘आप’ली
केजरीवालांनी राजकीय पक्षांना सरसकट निमंत्रण नाकारत भेदभावाला स्थान दिलेले नाही; मात्र पक्षाला दिलेला अभूतपूर्व पाठिंबा बघता संपूर्ण दिल्लीलाच निमंत्रण देत त्यांनी दिल्ली ‘आप’ली असल्याचे दाखवून दिले आहे. ‘‘सर्वांना अधिकार देणे माझे कर्तव्यच आहे. कृपया शपथविधीला या, कारण मी नव्हे तर तुम्ही सर्व जण मुख्यमंत्री बनत आहात’’असे आवाहन त्यांनी जाहिरातींतून केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Hotels Housefool; 'AAP' workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.