हुडहुडने उद्ध्वस्त गाव नायडू दत्तक घेणार
By Admin | Updated: October 24, 2014 03:32 IST2014-10-24T03:32:04+5:302014-10-24T03:32:04+5:30
हुडहुड चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेले आंध्र प्रदेशातील एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेण्याचे केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ठरविले आहे.

हुडहुडने उद्ध्वस्त गाव नायडू दत्तक घेणार
विशाखापट्टण : हुडहुड चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेले आंध्र प्रदेशातील एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेण्याचे केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ठरविले आहे.
आपण आणि आपले कुटुंबीय चेपालुपाडा हे गाव दत्तक घेऊन तेथे पुनर्वसनाचे काम करणार आहोत, असे नायडू यांनी येथे जाहीर केले. या गावाच्या पुनर्वसनासाठी कितीही रक्कम लागली तरी ती आपण खर्च करू, असे सांगून आपल्या खासदार निधीतून २५ लाख रुपये या कामासाठी दिले जातील, असेही नायडू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ आॅक्टोबर रोजी विशाखापट्टणमला भेट दिली तेव्हा त्यांनी केंद्रातर्फे वादळग्रस्तांसाठी राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. नुकसानीच्या नेमक्या अंदाजाचा अहवाल आल्यावर लागली तर आणखीही रक्कम देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे नायडू म्हणाले.
व्यंकय्या नायडू व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री येथे शेकडो नागरिकांनी हाती मेणबत्त्या व बॅटऱ्या घेऊन काढलेल्या फेरीचे नेतृत्व करून हुडहुड वादळग्रस्तांशी बांधिलकी प्रदर्शित केली. (वृत्तसंस्था)