घर वापसी - अमेरिकी पॅनेलचं RSS वर टीकास्त्र
By Admin | Updated: April 30, 2015 18:01 IST2015-04-30T17:13:10+5:302015-04-30T18:01:15+5:30
एका अमेरिकी संस्थेने भारतामध्ये मोदी सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांकडून अल्पसंख्याक धर्माच्या लोकांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचे म्हटले आहे

घर वापसी - अमेरिकी पॅनेलचं RSS वर टीकास्त्र
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक स्वातंत्र्याचा मागोवा घेणा-या एका अमेरिकी संस्थेने भारतामध्ये मोदी सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांकडून अल्पसंख्याक धर्माच्या लोकांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचे म्हटले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या घरवापसी उपक्रमावर या पॅनेलने जोरदार टीका केली असून मुस्लीम व ख्रिश्चनांना हिंदू होण्यासाठी आर्थिक प्रलोभने दाखवण्यात येत असल्याचा तसेच जबरदस्तीने करण्यात येणा-या घरवापसीच्या कार्यात मदत करणा-या हिंदूंनाही पैसे दिले जात असल्याचा आरोप केला आहे.
युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रीलीजियस फ्रीडम (USCIRF) या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये मोदी मुख्यमंत्री असताना झालेल्या गुजरात दंगली, अमेरिकेने नाकारलेला व्हिसा आदींचा उल्लेखही करण्यात आला आहे. मोदी हे अशा प्रकारे व्हिसा नाकारलेले एकमेव नेते असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मुस्लीम व ख्रिश्चन धर्मातली व्यक्तिंविरोधात हल्ले वाढल्याचे सांगताना असे प्रकार विशेषत: आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश महाराष्ट्र व राजस्थानमध्ये वाढल्याचे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधला घरवापसीचा कार्यक्रम, चर्चवर झालेले हल्ले नमूद करताना हे प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांनी किंवा संघटनांनी केल्याचेही USCIRF ने नमूद केले आहे.