हिंदूंनो, १० मुले जन्माला घाला - शंकराचार्य
By Admin | Updated: January 19, 2015 05:40 IST2015-01-19T05:40:59+5:302015-01-19T05:40:59+5:30
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हिंदूंनी प्रत्येकी १० मुले जन्माला घालावी, असा नवा संदेश बद्रीकाश्रमचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदू समाजाला दिला आहे.

हिंदूंनो, १० मुले जन्माला घाला - शंकराचार्य
अलाहाबाद : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हिंदूंनी प्रत्येकी १० मुले जन्माला घालावी, असा नवा संदेश बद्रीकाश्रमचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदू समाजाला दिला आहे.
येथील संगमावर ‘माघ मेळ्या’त बोलताना वासुदेवानंद सरस्वती शनिवारी रात्री म्हणाले की, हिंदूंच्या ऐक्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले आहेत. भारतातील हिंदूंची बहुसंख्य समाज म्हणून स्थिती कायम राखण्यासाठी प्रत्येक हिंदू कुटुंबाने १० अपत्ये जन्माला घालायला हवीत.
एवढेच नव्हेतर, संघ परिवाराशी संबंधित संघटनांनी ‘घर वापसी’च्या नावाने हाती घेतलेल्या धर्मांतर कार्यक्रमाचेही शंकराचार्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, ख्रिश्चन, इस्लाम व शीख या धर्मांची उत्पत्ती हिंदू धर्मातूनच झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मूळ धर्मातच परत यायला हवे. ‘घर वापसी’वर कोणताही प्रतिबंध असता कामा नये व धर्मांतराविरुद्धही कोणतीही कायदेशीर कारवाई करता कामा नये, असेही ते म्हणाले. हिंदूंनी चार मुले जन्माला घालावी, या भाजपा खासदार साक्षी महाराज यांच्या विधानाने उठलेले वादळ शमलेले नसतानाच शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आता हे १० अपत्यांचे खूळ काढले आहे. (वृत्तसंस्था)