मदरशांमध्ये शिक्षण घेतायंत हिंदू विद्यार्थी

By Admin | Updated: September 21, 2014 17:42 IST2014-09-21T17:42:06+5:302014-09-21T17:42:06+5:30

भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या मतदारसंघांमधील दोन मदरशांमध्ये चक्क हिंदू विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बनलेल्या या मदरशांमधील बहुतांशी शिक्षकही हिंदूच आहेत.

Hindu students while studying in Madarsas | मदरशांमध्ये शिक्षण घेतायंत हिंदू विद्यार्थी

मदरशांमध्ये शिक्षण घेतायंत हिंदू विद्यार्थी

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २१ - मदरशांना दहशतवादाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून संबोधित करणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या मतदारसंघांमधील दोन मदरशांमध्ये चक्क हिंदू विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बनलेल्या या मदरशांमधील बहुतांशी शिक्षकही हिंदूच आहेत. 
उत्तरप्रदेशमधील उन्नावमधील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी गेल्या आठवड्यात मदराशांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते असे बेताल विधान केले होते. मात्र हे विधान करताना साक्षी महाराज यांच्या मतदारसंघांमधील दोन मदरशांचा विसर पडलेला असावा असे दिसते. उन्नाव जिल्ह्यातील शुक्लागंज या गावातील दोन मदरशांमध्ये चक्क हिंदू विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचे उद्योग विविध राजकीय पक्षांकडून सुरु असले तरी हिंदू - मुस्लिम ऐक्याची ही अनोखी 'शाळा' चर्चेचा विषय ठरली आहे. या मदरशांमध्ये उर्दू, हिंदी, इंग्रजी, अरबी अशा सर्वच भाषा शिकवल्या जातात. मात्र हिंदू मुलांना उर्दू व अरबी भाषा शिकवली जात नाही. काही वर्षांपूर्वी या मदरशांमध्ये संस्कृत भाषाही शिकवली जात होती. मात्र पालक आणि विद्यार्थ्यांकडून याला प्रतिसाद न मिळाल्याने संस्कृत भाषेचा तास बंद करण्यात आला. 
मदरशांविषयी माहिती देताना मदरशांचे प्रबंधक मौलाना मोहम्मद जकाऊल्लाह म्हणतात, आमच्या नियाझूल उलूम निस्वा या मदरशामध्ये २५० विद्यार्थी शिक्षण घेत असून यात सुमारे ३० हिंदू आहेत. तर या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी १२ शिक्षक असून यातील सात शिक्षक हिंदू आहेत. मदरशात येण्या-या प्रत्येक विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाते. तर दारुल उलूम झियाऊल इस्लाम या मदरशामध्ये ४५० विद्यार्थी असून यामध्येही हिंदू विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे या मदरशात शिकणा-या विद्यार्थ्यांना जेवणापासून सर्व सुविधा मोफत दिल्या जातात असेही मौलाना मोहम्मद यांनी सांगितले.  या दोन्ही मदरशांना सरकारी मदत मिळत नाही. स्थानिक मुस्लिम व हिंदू ग्रामस्थ या मदरशांना आर्थिक सहाय्य करतात.  या दोन्ही मदरशांमध्ये १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीही उत्साहात साजरा केला जातो असे मौलाना मोहम्मद आवर्जून सांगतात. 

Web Title: Hindu students while studying in Madarsas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.