नवी दिल्ली - आज RSS बद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहे. बहुतांश लोकांना वाटते, संघ केवळ हिंदूसाठी कार्य करते. संघ हिंदू राष्ट्रासाठी काम करते, परंतु या हिंदू राष्ट्राचा अर्थ केवळ हिंदू नाहीत, भारतात राहणारे सर्व लोक हे आहेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. काही लोक हिंदू म्हणतात तर काही हिंदूऐवजी स्वत:ला भारतीय म्हणणं पसंत करतात. त्यांना हिंदू शब्दावर आक्षेप असू शकतो परंतु भारतीय म्हणण्यातही तीच राष्ट्रीयता दिसते जी हिंदू असण्यात आहे असं त्यांनी सांगितले.
दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी विखुरलेल्या समाजाला एक समाज म्हणून एकत्र आणणं या समस्येवर भाष्य केले. ते म्हणाले की, ही काही समस्या नाही, कारण कुणीही व्यक्ती ज्या धर्माला, ज्या पंथाला मानत असेल परंतु सर्व भारतीयांचा डिएनए हजारो वर्षापासून एक आहे. भारतासमोर मोठी समस्या आहे ती बेकायदेशीर धर्मांतरण..यूपी बिहारपासून दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यात अवैध धर्मांतरण फोफावले आहे. विविध राज्यात याबाबत कायदेही आहेत, त्यातून कारवाईही होत आहे. एकीकडे हिंदूंच्या मनात कुठे ना कुठे आपल्या धर्मातील लोकांचे धर्मांतरण केले जात असल्याची चिंता आहे तर दुसरीकडे मुस्लीम आणि ईसाई यांच्यात अवैध धर्मांतरणाविरुद्ध कारवाईच्या नावाखाली आपला छळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दाट संशय आहे असं त्यांनी सांगितले.
तर मागील ४० हजार वर्षापासून सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे. ते कुठल्याही धर्माला आणि पूजा पद्धतीला मानत असले तरी त्यांचे लक्ष्य एकच असते. विविध धर्माला मानणारे सर्व भारतीय आहेत आणि ते हिंदू राष्ट्रीयतेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अवैध धर्मांतरणाची आवश्यकता नाही. सर्व जण आपल्या धर्माचा स्वीकार करत त्यांचे टार्गेट मिळवू शकतो. समाजाच्या ताकदीमुळे संघ त्यांच्या उद्देशात यशस्वी होत आहे. स्वयंसेवकामुळे संघ मजबूत होतो. शाखेतून संघाचे स्वयंसेवक बनतात आणि ते संघाला पुढे नेतात. कार्यकर्त्यांपासून आर्थिक गरजांपर्यंत संघ स्वयंसेवकांवर निर्भर आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.
दरम्यान, जगात भारताचे योगदान देण्याची वेळ आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष तो दर्जा मिळवू शकलो नाही जो भारताला मिळायला हवा होता. आरएसएसचा हेतू देशाला विश्वगुरू बनवण्याचा आहे. जर आपल्याला आपला देश पुढे न्यायचा असेल तर कुणा एकावर हे काम सोडून चालणार नाही. प्रत्येकाला आपापली भूमिका निभवावी लागेल. समाजात परिवर्तन घडवावे लागेल असंही मोहन भागवत यांनी सांगितले.