हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला आंतरधर्मीय विवाह लावणार
By Admin | Updated: February 2, 2015 12:06 IST2015-02-02T11:49:48+5:302015-02-02T12:06:21+5:30
हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला प्रेमविवाह दिवस म्हणून साजरा करणार असून या दिवशी थाटामाटात आंतरधर्मीय विवाह लावले जाणार आहेत.

हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला आंतरधर्मीय विवाह लावणार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - व्हॅलेंटाईन डे आणि त्याला हिंदूत्ववादी संघटनांचा प्रखर विरोध हे चित्र नेहमीच दिसते. मात्र यंदा हिंदूत्ववादी संघटनांनी व्हॅलेंटाईन डे आगळ्या वेगळ्यापद्धतीने साजरा करायचा निर्णय घेतला आहे. हिंदू महासभा व्हॅलेंटाईन डेला प्रेमविवाह दिवस म्हणून साजरा करणार असून या दिवशी थाटामाटात आंतरधर्मीय विवाह लावले जाणार आहेत. मात्र यामध्ये दुस-या धर्मातील तरुणाने किंवा तरुणीने हिंदू धर्म स्वीकारण्याची अट घालण्यात आली असून या माध्यमातून 'घर वापसी' ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न हिंदू महासभेने केला आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यश्र चंद्रप्रकाश कौशिक यांनी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला प्रेमविवाह दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. याविषयी माहिती देताना कौशिक म्हणाले, लव्ह जिहादची अनेक प्रकरणं आपण बघितली आहेत. आता जर अन्य धर्मातील मुलगा खरोखर हिंदू मुलीवर प्रेम करत असेल तर त्याने हिंदू धर्म स्वीकारुन तिच्या लग्न करण्यात काहीच गैर नाही. हा दिवस त्यांच्या प्रेमाची परीक्षा बघणारा दिवस ठरणार असल्याचे कौशिक स्पष्ट करतात. मुस्लिम किंवा ख्रिश्चन जोडीदाराची लग्नाच्या एक दिवसापूर्वीच
त्याच्या मूळ धर्मात म्हणजेच हिंदू धर्मात 'घर वापसी केली जाणार असून इच्छुकांनी दोन दिवस अगोदर आमच्याकडे नावे नोंदवावीत .जेणेकरुन आम्हाला धर्मांतरासाठी आवश्यक तयारी करता येईल असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी हिंदू महासभेने सहा पथकं तयार केली आहेत. ही पथकं दिल्ली, उत्तरप्रदेशमधील हिंदू - मुस्लीम प्रेमी युगूलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करतील.