हिंदू मुलांना भगवा तर मुस्लिम मुलांना हिरवा गणवेश
By Admin | Updated: April 14, 2015 15:45 IST2015-04-14T15:45:37+5:302015-04-14T15:45:37+5:30
महापालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे गणवेश हा चर्चेचा विषय असतो. पण गुजरातमधील अहमदाबाद महापालिकेच्या शाळांमधील गणवेश हे त्यांच्या दर्जामुळे नव्हे तर चक्क रंगामुळे वादग्रस्त ठरले आहे.

हिंदू मुलांना भगवा तर मुस्लिम मुलांना हिरवा गणवेश
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १४ - महापालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांचे गणवेश हा चर्चेचा विषय असतो. पण गुजरातमधील अहमदाबाद महापालिकेच्या शाळांमधील गणवेश हे त्यांच्या दर्जामुळे नव्हे तर चक्क रंगामुळे वादग्रस्त ठरले आहे. सर्वाधिक हिंदू मुलं असलेल्या शाळेत भगव्या रंगाचा तर मुस्लीमबहुल भागातील शाळेतील मुलांच्या गणवेशासाठी हिरव्या रंगाचे गणवेश देण्यात आले आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाने रंग व विद्यार्थ्यांच्या धर्माचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला असला तरी गुजरातमधील शिक्षण तज्ज्ञांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
अहमदाबाद महापालिकेने शाहपूर आणि दानी लिम्दा या दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या आहेत. शाहपूर शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हे हिंदू आहेत. या विद्यार्थ्यांना भगव्या रंगाचा गणवेश देण्यात आल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे. तर मुस्लीमबहूल विभागातील दानी लिम्दा शाळेतील मुलांना हिरव्या रंगाचे गणवेश देण्यात आले आहे. यावरुन वाद निर्माण झाला असून शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांना नेमके कसले धडे द्यायचे आहेत असा सवाल उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये शाळा सुरु झाल्या, त्यानंतर आम्ही स्थानिकांची मदत घेत या विद्यार्थ्यांना गणवेश मिळवून दिले. या गणवेशाच्या रंगाचा आणि धर्मांचा काहीही संबंध नाही असा दावा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगदीश भावसार यांनी केला आहे.