PM Modi Meeting :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल्यानंतर, पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल आणि संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.
सैन्याला कारवाईसाठी फ्री हँड
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत हल्ल्यानंतरची परिस्थिती, सुरक्षा दलांची कारवाई आणि भविष्यातील रणनीती, यावर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि लष्कराला कारवाई करण्यासाटी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "दहशतवादाला योग्य उत्तर दिले जाईल. हल्ल्याचे लक्ष्य आणि वेळ सैन्याने ठरवावी." याशिवाय, अमरनाथ यात्रा आणि इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले आहे.
सिंधू पाणी करार स्थगितपहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला. भारताने पहिल्यांदाच इतकी मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन मोठी युद्धे झाली, परंतु हा करार यापूर्वी कधीही स्थगित करण्यात आला नव्हता. याशिवाय, भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा तात्काळ प्रभावाने रद्द करणे आणि पाकिस्तान उच्चायुक्तातील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणे, यासारखे मोठे निर्णयही घेण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय डझनभर लोक जखमी झाले. अलिकडच्या काळात झालेल्या सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मानला जातो. हल्ल्यानंतर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. यासाठी सुरक्षा दल विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत.