पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टी आणि टीएमसी आमदारांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली. या प्रकारामुळे सभागृहात मार्शल बोलवण्यात आले. या घटनेने मोठा गोंधळ उडाला त्यात भाजपा आमदार शंकर घोष यांना निलंबित करण्यात आले. विधानसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपा बंगालविरोधी आहे. बंगालमधील जनतेवर होणाऱ्या अन्यायावर त्यांना सभागृहात चर्चाच होऊ द्यायची नाही असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा भ्रष्टाचाऱ्यांची पार्टी असून ते मतचोरी करतात. संसदेत भाजपाने कसं आमच्या खासदारांना त्रास देण्यासाठी सीआयएसएफचा वापर केला हे आम्ही पाहिले. बंगालमध्ये एक दिवस नक्कीच असा येईल, जेव्हा भाजपाचा एकही आमदार या विधानसभेत नसेल. लोक भाजपाला मतदान करणार नाहीत. फक्त काही दिवस वाट पाहा, भाजपा सत्तेत राहणार नाही. मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार लवकरच कोसळणार आहे असा दावा त्यांनी केला.
तसेच विधानसभेत भाजपा मला बोलू देत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी भाजपा बोलेल तेव्हा चोर चोर बोलून आम्ही त्यांनाही बोलू देणार नाही. बंगाली भाषिकांवर भाजपाला सभागृहात चर्चा करायची नाही. त्यामुळेच विधानसभेत ते गोंधळ घालत आहेत. भाजपाला लाज वाटली पाहिजे अशी संतप्त भावनाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवली.
विधानसभेत काय घडले?
पश्चिम बंगाल विधानसभेचे ३ दिवसाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी भाजपा आणि टीएमसी आमदारांमध्ये मोठा गोंधळ झाला. विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि विरोधी भाजपा आमदारांमध्ये बंगाली भाषिक स्थलांतरितांवर होणाऱ्या अन्यायावर सरकारी प्रस्तावावर चर्चा करताना घोषणाबाजी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. ज्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रस्तावावर बोलत होत्या, तेव्हा विरोधी पक्षनेते शुभेंद्रु अधिकारी यांच्या निलंबनावरून भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यावर सत्ताधारी पक्षाकडूनही प्रत्युत्तर करण्यात आले. यातच विधानसभा अध्यक्षांनी भाजपाचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना सस्पेंड केले, त्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास मनाई केली तेव्हा मार्शल बोलावून त्यांना खेचत सभागृहाबाहेर काढले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.