नकली औषधनिर्मितीवर टाच -अहीर
By Admin | Updated: November 12, 2014 01:51 IST2014-11-12T01:51:40+5:302014-11-12T01:51:40+5:30
औषध स्वस्त करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करून, नकली औषधाची निर्मिती करण्यावर टाच आणू, असे केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले.

नकली औषधनिर्मितीवर टाच -अहीर
नवी दिल्ली : औषध स्वस्त करण्याच्या उपायांवर लक्ष केंद्रित करून, नकली औषधाची निर्मिती करण्यावर टाच आणू, असे केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्पष्ट केले.
अहीर यांनी मंगळवारी शास्त्री भवन येथील खते व रसायन मंत्रलयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारला. केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंतकुमार उपस्थित होते.
अहीर म्हणाले की खते व रसायनात देशाला स्वयंपूर्ण बनवायचे आहे. यूरिया आपण आयात करतो, त्याची निर्मिती देशात झाली तर खतांची उत्पादकता वाढेल व ती स्वस्तही होतील. बंद पडलेले खत कारखाने व आजारी रसायन उद्योगांना पुनर्जीवित करण्याची गरज आहे. परदेशी कंपन्या तर येणारच आहेत, पण देशी कंपन्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपले मंत्रलय काम करेल. हिंदुस्तान अॅण्टीबायोटिक्स व महाराष्ट्र अॅण्टीबायोटिक्स या सरकारी उद्योगांना पुन्हा उभारी देऊ. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिटय़ूटमध्ये चांगले संशोधन सुरू असून, त्यांना प्रोत्साहनासाठी आर्थिक मदतीची गरज पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
राजीव प्रताप रुडी यांनीही कौशल्यविकास, उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाची सूत्रे मंगळवारी स्वीकारली.
(विशेष प्रतिनिधी)
अहीर यांचा मुलगा श्यामल, विनय व चंदन हे पुतणो दालनात उपस्थित होते. अहीर यांचा आज वाढदिवस असल्याने मुलांनी त्यांना पेढा भरविला. सकाळी त्यांनी मथुरेला जाऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.