परतीच्या पावसाने दाणादाण! केरळमध्ये कहर; राज्यात साेयाबीन, धान व कापसाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:53 AM2021-10-18T06:53:28+5:302021-10-18T06:53:49+5:30

केरळात अतिवृष्टीचे २३ बळी; विदर्भ, मराठवाड्याला फटका

Heavy rains landslides kill 23 in Kerala huge loss of crops in vidarbha marathwada | परतीच्या पावसाने दाणादाण! केरळमध्ये कहर; राज्यात साेयाबीन, धान व कापसाचे नुकसान

परतीच्या पावसाने दाणादाण! केरळमध्ये कहर; राज्यात साेयाबीन, धान व कापसाचे नुकसान

Next

नवी दिल्ली/मुंबई : परतीच्या मोसमी पावसाने देशभरात सर्वत्र दाणादाण उडवली आहे. राजधानी दिल्लीत रविवारी जोरदार पाऊस झाला. तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेत केरळमध्ये तर पावसाने हाहाकार उडवला असून तिथे पाच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांमध्ये केरळात २३ जण मृत्युमुखी पडले. दरम्यान, राज्यालाही परतीच्या पावसाचा फटका बसला असून मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने पिकांचे नुकसान झाले.  

तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहा:कार उडवला असून दरडी कोळणे, भूस्खलन, महापूर अशा विविध घटनांमध्ये राज्यभरात रविवारी २३ जणांचा मृत्यू झाला. पुरामध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ व लष्कराने कोट्टयम जिल्ह्यातील कुट्टीकल व कोकयार भागात मदतकार्य सुरू केले आहे. 

पावसाचा सर्वांत जास्त तडाखा इडुक्की व कोट्टयम या जिल्ह्यांना बसला आहे. कोट्टयम जिल्ह्यात १२ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. इडुक्की व आणखी काही भागांत पावसाने ११ जणांचा बळी घेतला. कोट्टयम, इडुक्की, पतानामतिटा या ठिकाणच्या डोंगराळ भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मीनाचल व मणिमला या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रचंड पावसामुळे केरळच्या बहुतांश जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. पूरस्थितीमुळे काही लहान शहरे, गावांचा संपर्क तुटला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. पुराच्या पाण्याने वेढलेल्या रहिवाशांची सुटका करण्यासाठी लष्कर, हवाई दल तसेच नौदलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले आहे. वेळप्रसंगी एमआय-१७ व सारंग या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दखल 
केरळमधील पावसाच्या कहराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला. 
पावसाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणारे ट्विटही मोदी यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केरळ सरकारशी संपर्क साधत केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

विदर्भ, मराठवाड्याला फटका; पिकांचे मोठे नुकसान
औरंगाबाद/नागपूर/जळगाव : राज्यातून मान्सून परतल्याची वर्दी दिल्यानंतरही शनिवार रात्रीपासून विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह जळगावमध्येही जोरदार हजेरी लावली. नंदुरबार व नाशिकमध्ये रविवारी हलका पाऊस झाला. पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात साेयाबीन, धान व कापसाला फटका बसला. नद्यांना पूर आल्याने अनेक धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे.

मराठवाडा : बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, वडवणी, शिरूर व केज तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू आहे. हिंगोली परिसरात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे कापणी करून ठेवलेला सोयाबीनचा ढीग वाहून जात होता. 

विदर्भ : विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिराेली, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यांत रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाचा प्रामुख्याने साेयाबीन, धान व कापूस पिकांना फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीनसह धानाचेही  नुकसान झाले. गडचिराेली, बुलडाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यांत रविवारी ठिकठिकाणी पाऊस झाला.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हाहाकार
पावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपले. रविवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. धरणसाठ्यातही मोठी वाढ झाली. वाघूर धरणाचे आठ तर हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. 
पावसाचा जामनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. पावसाने कापूस ओला झाला तर भाजीपाला व इतर पिकांवरही परिणाम होणार आहे. नाशिकला रविवारी संध्याकाळी पाऊस झाला. नंदुरबारमध्येही पाऊस झाला.

Web Title: Heavy rains landslides kill 23 in Kerala huge loss of crops in vidarbha marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.