राजकारणात येण्याचे ‘हार्दिक’ संकेत
By Admin | Updated: October 1, 2015 22:35 IST2015-10-01T22:35:50+5:302015-10-01T22:35:50+5:30
गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवा नेते हार्दिक पटेल यांनी राजकारणात येण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत

राजकारणात येण्याचे ‘हार्दिक’ संकेत
नवी दिल्ली : गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवा नेते हार्दिक पटेल यांनी राजकारणात येण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. जनतेची इच्छा असेल तर मी राजकारणातही येईन, असे ते म्हणाले.
पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते असलेल्या हार्दिक यांनी बुधवारी दिल्लीत अखिल भारतीय पटेल नवनिर्माण सेना या नव्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली. ही संघटना पटेल समाजासोबतच कुर्मी, गुज्जर, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना हार्दिक यांनी मनमोकळी उत्तरे दिली. वेळ येईल तेव्हा राजकारणात उतरण्याच्या निर्णयावर विचार करू. आपण सर्वांनी निर्णय घेतला तरच कदाचित मी राजकारणात येईन, असे हार्दिक एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. पाटीदार अनामत आंदोलन समिती गुजरातेत कार्यरत असताना अखिल भारतीय पटेल नवनिर्माण सेना या नव्या संघटनेच्या उभारणीची गरज का वाटली, असे विचारले असता, ही नवी संघटना देशातील २७ कोटी कुर्मी, गुज्जर, मराठा आणि पाटीदारांना एकत्र आणण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. ही पूर्णत: अराजकीय संघटना असल्याचेही ते म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)