निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध 'सेला' या गोठलेल्या तलावावर चालण्याचा मोह केरळच्या दोन तरुणांच्या जीवावर बेतला. एका मित्राचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही तरुण गोठलेल्या लेकमध्ये बुडाले. ही धक्कादायक घटना तवांग जिल्ह्यात घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे नेमकी घटना?
केरळमधून ७ पर्यटकांचा एक गट गुवाहाटीमार्गे तवांग फिरायला आला होता. शुक्रवारी दुपारी हे पर्यटक १३ हजार फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध 'सेला लेक'जवळ पोहोचले. यावेळी तलावातील पाणी पूर्णपणे गोठलेले होते. या गोठलेल्या बर्फावरून चालण्याचा मोह या पर्यटकांना आवरता आला नाही. चालत असताना अचानक एका पर्यटकाचा पाय घसरला आणि तो बर्फाच्या थराखालच्या गोठलेल्या पाण्यात पडू लागला.
त्याला वाचवण्यासाठी त्याचे इतर दोन मित्र दिनू आणि महादेव यांनी पाण्यात उडी घेतली. ज्या मित्राचा पाय घसरला होता तो सुदैवाने बाहेर पडण्यात यशस्वी झाला, मात्र दिनू आणि महादेव या दोघांचाही बर्फाळ पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रात्री उशिरापर्यंत बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस, केंद्रीय दल आणि एसडीआरएफच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. कडाक्याची थंडी आणि कमी दृश्यमानता असूनही बचाव पथकाने एका पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र, अंधार आणि खराब हवामानामुळे महादेवचा शोध थांबवावा लागला. शनिवारी सकाळपासून पुन्हा दुसऱ्या मृतदेहासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.
प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डी. डब्ल्यू. थोंगोन यांनी पर्यटकांना आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यातच एक नियमावली जारी केली होती. गोठलेल्या तलावांवर फिरणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते. तलावावरील बर्फाचा थर वरून जरी टणक वाटत असला तरी तो माणसाचे वजन पेलण्याइतपत मजबूत नसतो. पर्यटकांना सावध करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले आहेत, मात्र पर्यटकांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
Web Summary : Two Kerala tourists drowned in Arunachal's Sela Lake after venturing onto the frozen surface. Ignoring warnings, they fell through thin ice while trying to save a friend. Rescue efforts continue amidst challenging conditions.
Web Summary : अरुणाचल की सेला झील में जमे हुए सतह पर जाने के बाद केरल के दो पर्यटक डूब गए। चेतावनियों को अनदेखा करते हुए, वे एक दोस्त को बचाने की कोशिश करते समय पतली बर्फ में गिर गए। चुनौतीपूर्ण परिस्थितियों के बीच बचाव प्रयास जारी हैं।