UP Doctor:उत्तर प्रदेशच्या महाराजा तेज सिंह जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी आलेल्या महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात जाब विचारणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांना डॉक्टरने जबर मारहाण केली. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कर्तव्यावर असलेले डॉक्टर त्यांच्या मोबाईल फोनवर रील्स पाहत होते, असा आरोपी महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. निष्काळजीपणामुळे एका ६० वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपला जीव गमवावा लागला आहे. जेव्हा डॉक्टरला रुग्णावर उपचार करायचे होते तेव्हा ते मोबाईलवर रिल्स पाहत होते, असा मृताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. जेव्हा महिलेची प्रकृती बिघडली तेव्हा तिच्या मुलाने जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा डॉ. आदर्श सेंगरने त्याला कानाखाली मारली. यानंतर महिलेचे नातेवाईक सेंगरच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मैनपुरीच्या सौतियाना परिसरातील रहिवासी गुरुशरण सिंह यांची आई प्रवेश कुमारी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांनी आईला महाराजा तेज सिंह जिल्हा रुग्णालयात नेले. अतिदक्षता विभागात गेल्यानंतर प्रवेश कुमारी यांना स्ट्रेचरवर झोपवण्यात आले. त्यावेळी इतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी सुरु केली. त्यावेळी डॉक्टर आदर्श सेंगर हे अतिदक्षता विभागात कर्तव्यावर होते. गुरुशरणने आरोप केला की डॉ. आदर्श सेंगर त्यांच्या खुर्चीवर बसून इन्स्टाग्राम, फेसबुकवर रील पाहत होते. त्यांना बघण्यासाठी अनेकवेळा विनंती केली. पण ते खुर्चीवरून उठले नाहीत आणि त्यांनी नर्सला आईला बघण्यास सांगितले.
जेव्हा प्रवेश कुमारी यांची तब्येत आणखी बिघडली तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हाही सेंगर जागेवरुन उठले नाहीत. प्रवेश कुमारी निपचित पडल्यानंतर शिकाऊ डॉक्टरांनी सेंगर यांना सांगितले आणि तेव्हा ते जागेवरुन उठले. तोपर्यंत गुरुशरण यांच्या आईचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी जाब विचारायला सुरुवात करताच सेंगर यांनी गुरुशरणच्या कानाखाली लगावली. त्यानंतर संतप्त कुटुंबिय डॉक्टरांच्या अंगावर धावून गेले.
सिंग पुढे म्हणाले: "मी आणि माझा भाऊ पूर्णपणे तणावात होतो. आम्ही तिचे हातपाय चोळत होतो, कारण आम्हाला काय करावे हे माहित नव्हते. १५ मिनिटे असंच चालू होतं. अचानक, माझ्या आईच्या तोंडातून रक्त येऊ लागले. आम्ही घाबरलो आणि काय करावे हे आम्हाला कळत नव्हते. डॉक्टर अजूनही त्यांच्या खुर्चीवर बसले होते. शेवटी जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा ते रागात होते. नंतर त्यांनी मला चापट मारली," असं गुरुशरणने सांगितले.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर सेंगर त्याच्या खुर्चीवर बसून फोनकडे पाहत असल्याचे दिसत आहे. तर परिचारिका रुग्णाला हाताळत आहेत. फुटेजमध्ये डॉक्टर सेंगर गुरुशरणला कानाखाली मारतानाही दिसत आहे. ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.