नवी दिल्ली : राजधानीतील नव्या महाराष्ट्र सदनातील एका मुस्लीम कर्मचाऱ्याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबून त्याला रोजा तोडण्यास भाग पाडणाारे शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या कृत्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर येथील न्यायालय येत्या १८ आॅगस्टला सुनावणी करणार आहे़विचारे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १५३ ए (समाजात तेढ वाढविणे), कलम ३२३ (जाणीवपूर्वक भावना दुखविणे), कलम ३४१ ( कुठल्याही व्यक्तीवर बळजबरी करणे) आणि कलम ५०६ (धमकाविणे) गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी याचिका कमरान सिद्दीकी यांनी दाखल केली आहे़ महान्यायदंडाधिकारी पुनित पाहवा यांनी या याचिकेवरील सुनावणीसाठी १८ आॅगस्ट ही तारीख निश्चित केली़राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनातील एका रोजा असलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्याच्या तोंडात शिवसेना खासदार जबरदस्ती चपाती कोंबतानाचे व्हिडिओ फुटेज प्रसारित झाल्याने देशभर काहूर उठले होते़ गत १७ जुलैला शिवसेनेचे ११ खासदार महाराष्ट्र सदनात गेले होते़ तेथे त्यांना महाराष्ट्रीय जेवण मिळाले नसल्यामुळे ते संतापले होते़ याच संतापात आपल्या तक्रारीची कुणी दखल घेत नाही, असे म्हणत ते कॅन्टीनमध्ये घुसले. तेथे उपस्थित अर्शद जुबेर या कर्मचाऱ्याला त्यांनी जाब विचारला़ याच वेळी पक्षातील सहकाऱ्यांसमक्ष खासदार राजन विचारे यांनी अर्शद जुबेरच्या तोंडात जबरदस्ती चपाती कोंबण्याचा प्रयत्न केला होता़ हे प्रकरण उजेडात येताच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या़(लोकमत न्यूज नेटवर्क)
चपातीप्रकरणी सोमवारी सुनावणी
By admin | Updated: August 11, 2014 01:11 IST