नवी दिल्ली : दिल्लीत कार्यरत असताना सरकारी निवासस्थानी जळालेल्या चलनी नोटा सापडल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या २८ जुलै रोजी सुनावणी करेल. याप्रकरणी अंतर्गत चौकशी समितीने दिलेला अहवाल रद्दबातल ठरवावा, अशी विनंती न्या. वर्मा यांनी केली आहे.
चौकशी समितीने न्या. वर्मा यांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले असल्याबद्दल त्यांना दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी होईल. याप्रकरणी संसदेत महाभियोग सुरू करण्यासंबंधी सरन्यायाधीशांनी ८ मे रोजी केलेली शिफारसही रद्द करावी, अशी विनंती न्या. वर्मा यांनी केली आहे.
काय होता चौकशी समितीचा अहवाल?
याप्रकरणी न्यायाधीशांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली होती. १० दिवसांत ५५ पुरावे या समितीने पडताळले. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. यानंतर दिलेल्या अहवालात हे प्रकरण हाताळण्यात न्या. वर्मा जबाबदारीच्या दृष्टीने अपयशी ठरल्याचे नमूद करण्यात आले होते.
प्रकरण काय?
न्या. वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका स्टोअर रूमला १४ मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आग लागली. यावेळी वर्मा किंवा कुटुंबीय घरी नव्हते. ही आग विझविली जात असताना जळालेल्या अवस्थेत चलनी नोटा सापडल्या. याप्रकरणी न्या. वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.