नवी दिल्ली - दीर्घ काळात न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. १० दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अर्जावर आज सुनावणी करताना न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठाने मुख्य याचिकेवर सुनावणी करणे योग्य राहील असं सांगत ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेऊ असं स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे.
ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायधीशांनी मुख्य याचिकेवरच आपण सुनावणी घेऊया असं सांगत ऑगस्टमध्ये सुनावणी करू असं सांगितले. पुढील २-३ दिवसांत ऑगस्टमधील सुनावणीची तारीख देऊ असं कोर्टाने सांगितले. जर ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणावर निकाल येऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याआधी झाल्या तर जैसे थे परिस्थिती असेल असं त्यांनी सांगितले.
न्या. सूर्यकांत, न्या. बागची यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंकडून मुकुल रोहतगी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर बाजू मांडली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत कोर्टाने तात्पुरता निर्णय दिला होता, ज्यात अजित पवारांना पक्ष चिन्हाबाबत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा उल्लेख करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवसेना धनुष्यबाण यावर निर्णय द्यावा अशी मागणी करणारा अर्ज ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली.
सुनावणीत काय घडले?
आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत खूप मोठे विधान केले. आता अर्ज दाखल करणे हे बंद करून हे प्रकरण जे २ वर्षापासून प्रलंबित आहे. त्याची सुनावणी ऑगस्टमध्ये घेऊ असं सुप्रीम कोर्टाने आज सांगितले. कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमधील तारीख मागितली तेव्हा १-२ दिवसांत वेळापत्रक पाहून ऑगस्टमधील तारीख देण्यात येईल असं न्या. सूर्यकांत यांनी म्हटले. ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाल्यास पुढील ३ महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागू शकतो असं वकील शिंदे यांनी म्हटलं. या प्रकरणाला २ वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेतच सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत दिले.
पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळणार?
ऑगस्टमध्ये होणाऱ्या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की पुन्हा उद्धव ठाकरे यांना दिले जाणार हे कळणार आहे. न्या. बागची, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज यावर सुनावणी झाली. या प्रकरणाबाबत जी अनिश्चितता होती त्याला आजच्या सुनावणीत ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी तारीख देऊ असं कोर्टाने सांगितल्याने उद्धव ठाकरेंसाठी ही दिलासादायक बाब आहे. ऑगस्टमध्ये निकाल अपेक्षित नाही परंतु सुनावणी सुरू झाली तर या वर्षाअखेरीस शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे स्पष्ट होईल असं सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं.