अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कर्नाटकातीलकाँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीच्या छाप्यात कोट्यवधीचे घबाड समोर आले आहे. या काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यात कोट्यवधींच्या ज्वेलरीसह, 12 कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. यात जवळपास एक कोटी रुपयांचे परदेशी चलन आहे.
यासंदर्भात तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या बेंगलोर प्रादेशिक कार्यालयाने 22 आणि 23 ऑगस्टला गंगटोक, चित्रदुर्ग जिल्हा, बेंगलोर शहर, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोव्यासह भारतभरात 31 ठिकाणी छापे टाकले. महत्वाचे म्हणजे, यात 5 कसीनोंचाही समावेश आहे.
काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर छापे - ही शोध मोहीम चित्रदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन बेटिंगच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांशी संबंधित आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किंग 567, राजा 567, पपीज 003 आणि रत्ना गेमिंग सारख्या नावाने अनेक ऑनलाइन सट्टेबाजी साइट्स चालवत होता.
याशिवाय, आरोपीचा भाऊ, केसी थिप्पेस्वामी हा दुबईतून, डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज, प्राइम९ टेक्नॉलॉजीज या ३ व्यावसायिक संस्था चालवतो. या संस्था केसी वीरेंद्रच्या कॉल सेंटर सर्व्हिस आणि गेमिंग संचालनाशी संबंधित आहे.
आमदाराकडे सापडलं एवढं घबाड -या कारवाईत जवळपास १ कोटी रुपयांच्या परदेशी चलनासह सुमारे १२ कोटी रुपये रोख, जवळपास ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सुमारे १० किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि मर्सिडीजसह चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच, १७ बँक खाती आणि २ बँक लॉकर्सदेखील गोठवण्यात आले आहेत. याशिवाय, के सी वीरेंद्र यांचा भाऊ के सी नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन राज यांच्या ठिकाणांवरून मालमत्तांशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. याच बरोबर काही आक्षेपार्ह दस्तऐवजही जप्त करण्यात आले आहेत.