आरोग्यसेवा पेपरलेस, एका क्लिकवर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:33 AM2020-01-01T04:33:52+5:302020-01-01T04:34:08+5:30

डिजिटल क्रांतीचा फायदा; रुग्ण आणि डॉक्टरांच्या वेळ, श्रमात होणार बचत, उपचारांमध्ये येणार अचूकपणा

Healthcare is paperless, with one click | आरोग्यसेवा पेपरलेस, एका क्लिकवर मिळणार

आरोग्यसेवा पेपरलेस, एका क्लिकवर मिळणार

Next

- चंद्रकांत कित्तुरे

आरोग्यसेवा क्षेत्रात डिजिटल क्रांतीने खूप मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. नवनव्या संशोधनांमुळे नव्या वर्षात भारतातही हे बदल मोठ्या प्रमाणात जाणवतील, असे चित्र आहे. आर्टिफिशियल इंटिलेजन्स, क्लाउड तंत्रज्ञानामुळे रुग्ण कुठेही गेला, तरी त्या रुग्णालयात त्याचा पूर्वेतिहास, लक्षणे, झालेले उपचार एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर, ‘स्पीच टू टेक्स्ट’ या तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांनाही पेपरलेस होता येणार आहे. त्यामुळे त्यांचे श्रम आणि वेळ यात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. मुंबईसह देशात काही ठिकाणी याची सुरुवात झाली आहे. या वर्षात त्यांचे जाळे विस्तारलेले दिसणार आहे.

भारतातील हेल्थकेअर किंवा आरोग्यसेवा हे महसूल आणि रोजगाराच्या दृष्टीने एक मोठे क्षेत्र आहे. रुग्णालये, मेडिकल डिव्हायसीस, क्लिनिकल ट्रायल्स, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसीन, मेडिकल टुरिझम, हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा ) आणि मेडिकल इक्विपमेंटस् (वैद्यकीय उपकरणे) आदींचा या क्षेत्रात समावेश होतो. या क्षेत्रात होत असलेल्या सरकारी आणि खासगी गुंतवणुकीमुळे देशात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि उपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचले आहेत.

सध्या रुग्णालयात गेले की, आपल्याला केसपेपर काढावा लागतो. तो पुढील वेळी दाखवावा लागतो. शिवाय एक्सरे किंवा इतर वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सोबत न्यावे लागतात. रुग्णालयांमध्ये असलेल्या नोंदीही कागदोपत्री असतात. अलीकडे त्या संगणकावर करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी त्या संबंधित रुग्णालयापुरत्याच असतात. डिजिटल क्रांतीमुळे या सर्व नोंदी डिजिटल स्वरूपात ठेवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. याचाच अर्थ, पेपरबेस्ड रेकॉर्डस्वरून डिजिटल बेस्ड रेकॉर्डस्कडे हे क्षेत्र जात आहे. भारतात त्याचा वेग कमी असला, तरी त्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

आरोग्यसेवा कुणालाही, कुठेही देण्यासाठी हे डिजिटल बेस्ड रेकॉर्ड पायाभूत काम करते. क्लाउडवरती हे रेकॉर्ड उपलब्ध केल्यानंतर ते सर्वांसाठी २४ तास उपलब्ध होऊ शकते. मात्र, यासाठी प्रत्येक रुग्णालयाने आपल्या रुग्णांच्या सर्व नोंदी यासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. यासाठी आधार क्रमांकाप्रमाणे प्रत्येक रुग्णाला एक नंबर किंवा कोड दिला जातो. तो नंबर किंवा कोड देशातील कोणत्याही रुग्णालयात जाऊन दिला की, तेथे त्या रुग्णाचा केसपेपर उपलब्ध होतो. आपल्याकडे सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले पाहिजेत.

आर्टिफिशियल इंटिलेजन्स
या सर्व डिजिटल रेकॉर्डस्चा डेटाबेस आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर करून, त्याचे पृथक्करण करून आपल्याला काय हवे ते मिळवू शकतो. उदा. महाराष्टÑातील सर्व रुग्णांचा डेटा उपलब्ध असल्यास त्याच्या आधारे एखाद्या साथीच्या, आजाराचा कल मिळविता येतो. कोणत्या वयोगटात, वर्गात त्याची लागण आहे? कोणत्या भागात, किती प्रमाणात लागण आहे? याचीही माहिती यामध्ये मिळते. ज्यामुळे उपाययोजना करणे सरकारला सोयीचे होते.

मशिन लर्निंग
आर्टिफिशियल इंटिलेजन्समध्ये आपल्याला काय हवे, ते सांगावे लागते. मात्र, मशिन लर्निंग सिस्टीममध्ये डाटा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याची पडताळणी करून एखाद्या आजाराचे संशयित किती आहेत? हे कळू शकते. उदा. पाच लाख रुणांचा डाटा असेल, तर त्याची पडताळणी करणे मानवाला खूपच वेळखाऊ असते. मशिन लर्निंगमध्ये या सर्व डेटाचे पृथक्करण करून त्यातील संशयित रुग्णांची संख्या मिळते. ती डॉक्टरांकडे सुपुर्द करून खरोखर त्यांना याची लागण झाली आहे का? तिचे प्रमाण किती आहे? हे जाणून त्यांच्यावर उपचार करता येतात. हे तंत्रज्ञानही भारतात नव्या वर्षात येण्याची शक्यता आहे.

आयओटी (गॅजेटस्)
आपल्या आरोग्याची काळजी घेणारी अनेक गॅजेटस् उपलब्ध आहेत. आजकाल प्रत्येकाजवळ असे एखादे गॅजेट दिसू लागले आहे. मात्र, ही गॅजेट्स वैयक्तिक स्वरूपात आहेत. त्या सर्व गॅजेट्सचा डेटा एकत्रित करावयाचा झाल्यास तो प्रचंड होतो. ती व्यवस्थाही सध्या नाही. या डेटाच्या आधारे काय काय करावयाचे, याचेही अद्याप ठोस काही निष्कर्ष नाहीत; पण हा एक मोठा ट्रेंड आहे आणि तो वाढत चालला आहे, हे मात्र निश्चित.

टेलिमेडिसिन
टेलिमेडिसिन याचा अर्थ, डॉक्टरांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रुग्णांशी संवाद साधून, त्याचा अहवाल पाहून आवश्यक ते उपचार सुचविणे किंवा करणे होय. मोठ्या शहरातील प्रसिद्ध आणि व्यस्त डॉक्टरांना ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरांमध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी स्थानिक रुग्णालयांच्या सहकार्याने अशा मोठ्या डॉक्टरांची सेवा टेलिमेडिसिनद्वारे कोणत्याही भागात आणि कधीही उपलब्ध होऊ शकते. या सेवेचा वापरही सातत्याने वाढत आहे.

स्पीच टू टेक्स्ट
वैद्यकीय क्षेत्रात ‘स्पीच टू टेक्स्ट’ या तंत्रामुळे मोठी क्रांती होत आहे. भारतातही ती येत आहे. यात डॉक्टरने रुग्ण कोणत्या आजारावर उपचारासाठी आला आहे, हे फक्त ‘कम्प्लेन’ असा शब्द उच्चारून त्याची काय तक्रार आहे, ते तोंडी सांगायचे. त्याची नोंद आपोआप संगणकावर होते. ‘प्रिस्क्रिप्शन’ असा शब्द उच्चारून कोणती औषधे घ्यावयाची, ते सांगितले की, त्याचीही नोंद होते. डॉक्टरांनी फक्त बोलायचे, त्याच्या सर्व नोंदी संगणकावर होऊन त्या सर्व्हरवरही जातात. कोल्हापुरातील ‘मनोरमा इन्फोसोल्युशन्स’ कंपनीने हे तंत्र विकसित केले आहे. याचा वापर मुंबई महापालिकेच्या बहुतांशी रुग्णालयात सुरू आहे. कंपनीने इंटिग्रेटेड सोल्युशन्स तयार केली आहेत. त्यातील स्मार्ट सिटी सोल्युशन, स्टेट अँड नॅशनल हेल्थ डेटा रिपॉझिटरी सोल्युशन सध्या गुजरातमधील बडोदा आणि दाहोद येथे वापरली जात आहेत.

सातत्याने निरीक्षण
डिजिटल उपचार पद्धतीमुळे आपल्याला सातत्याने निरीक्षण (कंटिन्युटी आॅफ केअर) ठेवता येते. उदा. रुग्णाचा पूर्वेतिहास, त्याला कोणती अ‍ॅलर्जी आहे का?, रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग यांसारखे विकार आहेत का?, असतील तर त्यासाठी त्याने किती वेळा, किती दिवस, कु ठे आणि कोणते उपचार घेतले? याची माहिती कु ठेही उपलब्ध होते. परिणामी, डॉक्टरांना पुढील उपचार करणे सोयीचे होते.
याशिवाय सीपीओई (क्लिनिकल फिजिशियन आॅर्डर एंट्री) हे नवे तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये डॉक्टर रुग्णाची कोणती चाचणी (टेस्ट) करायची? याचे सिस्टीममधूनच आदेश देतो. ते आदेश थेट प्रयोगशाळेत जातात. तेथे रुग्णांची तपासणी केली जाते. त्या चाचणीचा अहवाल थेट डॉक्टरांच्या संगणकावर येतो, तसेच तो रुग्णालाही उपलब्ध होऊ शकतो.

क्लाउडवर सर्व्हर : क्लाउड तंत्रज्ञानामुळे हेल्थकेअर कंपन्या, रुग्णालयांना आपला डाटा क्लाउड सर्व्हरवर ठेवण्याची सोय आहे. यामुळे संगणक, त्यासाठी लागणारे तज्ज्ञ, तसेच कर्मचारी ठेवावे लागत नाहीत. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते आहे. या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या शहरांमध्ये सुरू झाला आहे. नव्या वर्षात त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Web Title: Healthcare is paperless, with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.