काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे वैवाहिक बलात्कार या संवेदनशील विषयावर भाष्य केले. भारतात बलात्कारविरोधी कडक कायदे असूनही, पतीने पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, याबद्दल थरूर यांनी चिंता व्यक्त केली.
प्रभा खेतान फाउंडेशन आणि फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. थरूर यांनी निदर्शनास आणून दिले की, "भारतात बलात्कारविरोधी कायदे मजबूत आहेत, तरीही पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतींना कायद्यातून सूट मिळते, जे एक प्रकारे वैवाहिक बलात्कार आहे. मग पतींना सूट का दिली जाते?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
शशी थरूर पुढे म्हणाले की, "जर एखादा व्यक्ती त्याच्या जोडीदाराचा आदर करत नसेल आणि वैवाहिक संबंधांचा हवाला देऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत असेल, तर ते कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आणि महिलांवरील हिंसाचार आहे." पतीला वैवाहिक बलात्काराच्या आरोपातून मिळणाऱ्या या सूटला थरूर यांनी न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले. वैयक्तिक कारणांमुळे जोडपे वेगळे राहण्याचा निर्णय घेतता. परंतु, घटस्फोट घेतला नाही, तिथे हा प्रकार अनेकदा घडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, "अनेक प्रकरणात असे पाहायला मिळते की, वयैक्तिक कारणांवरून जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नाही, तिथे वैवाहिक बलात्कार अधिक प्रमाणात होतो. पतीला वाटेल तेव्हा तो परत येतो आणि पत्नीवर वैवाहिक बलात्कार करतो. पण काहीही करता येत नाही. कारण कायदा अजूनही त्यांना पती-पत्नी मानतो," असेही थरूर म्हणाले. देशात महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी घरगुती बलात्काराविरुद्ध योग्य कायदा आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.